A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनंता तुझे गोल तारे तुझे

अनंता, तुझे गोल, तारे तुझे,
तुझें रूप ब्रह्मांड सारें तुझें,
तुझीं ही कृती रे मनोमोहना,
अहोरात्र गाई तुझ्या गायना.

तया मूक गानें मना मोहिलें,
जगन्‍नायका, वेड कीं लाविलें;
नुरे भान, मी स्वाधिकारा भुलें;
भरूं लागलो सूर वेडे खुळे.

मदी त्या तुझें रूप गाऊं धजें,
स्वयंदीपका दीप दावूं सजें;
न द्यावा जिथे पाय तेथे दिला,
बहू लाजलों भान येतां मला

तुझे लाडके रे, तुझे लाल जे
वृथा स्पर्धण्या त्यांसवें मी धजें;
करोनी दया रे दयासागरा,
क्षमस्व प्रभो, या तुझ्या लेकरा.

अहो भाग्य माझें जरी या सुरीं
सहस्रांश त्या गीतिची माधुरीं !
तरी हे त्वदंघ्रीं समर्पी हरी !
रुचो हें तुला स्तोत्र, घे आवरीं.
गीत - भा. रा. तांबे
संगीत - गजानन वाटवे
स्वराविष्कार- गजानन वाटवे
पं. कुमार गंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - प्रार्थना
  
टीप -
• काव्य रचना- ८ फेब्रुवारी १९२०, प्रतापगढ.
• स्वर- गजानन वाटवे, संगीत- गजानन वाटवे.
• स्वर- पं. कुमार गंधर्व, संगीत- पं. कुमार गंधर्व, राग- पंचम मालकंस.
'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून.

अंघ्री - पाय.
नोंद
या कवितेवरून कवीची सान्‍ताकडून अनंताकडे दृष्टी वळली आहे, असे वाटते.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

 

  गजानन वाटवे
  पं. कुमार गंधर्व