A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंग अंग तव अनंग

अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी
देवदूत याचितात सुखद-संग माधुरी

मंद मंद हसित-लसित
वदन प्रणयरंग सदन
रूपरंग बहर तुझा कहर करी अंतरी

तव यौवन रंगदार
चाल तुझी डौलदार
जादुभरे नैनबाण हरिति प्राण सुंदरी
अनंग - मदन.
मदनमंजिरी - सुंदरी.
लसित - आनंदी, उल्लसीत.
प्रिये,
महाराष्ट्राच्या रसिकते ! ह्या वसंत ऋतूत ही 'मदनाची मंजिरी' तुझ्या सेवेसी रुजू करताना मला अत्यंत आनंद होत आहे. ह्यापूर्वी 'पंडितराज जगन्‍नाथ', 'सुवर्णतुला', 'मंदारमाला' इत्यादी माझ्या कलाकृतींचे तू जसे प्रेमाने स्वागत केलेस तसेच ह्या नाट्यकृतीचेही तू स्वागत करशील अशी आशा वाटते.

गुण-पूजिके, तुझ्याच बळावर मी आजवर क्षुद्रमनस्कांचे टीकाप्रहार लीलया सहन करू शकलो. तुझ्याच प्रोत्साहनाने नाट्यशारदेची यथामति पण मनोभावे पूजा करू शकलो. ही 'मदनाची मंजिरी' देखील त्याच पूजनाचा एक अल्पसा भाग आहे.

ही नाट्यकृती महाकवि शेक्सपिअरच्या एका विख्यात नाट्याच्या ('ट्वेल्थ नाइट'च्या) आधारे उभी आहे. इतके भक्कम अधिष्ठान लाभल्यावर तिला प्रतिष्ठा का लाभणार नाही? सुगम रागदारीचे अन् रंगभर्‍या अनुरागाचे विभ्रम करीत, रसिकांना एका मनोरंजक मुग्ध बातावरणात घेऊन जाणारी ही एक प्रहसनात्मक नाट्यरचना आहे.

प्रिये रसिकते ! अशी ही 'मंजिरी' तू तुझ्या केशकलापात धारण करशील, अशी आशा आहे.

कळावे, लोभ आहेच; तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती.
तुझा स्‍नेहभूषित,
(संपादित)

विद्याधर गोखले
'मदनाची मंजिरी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अरविंद रघुनाथ तेंडुलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.