A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरे अरे ज्ञाना झालासी

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
रया - तेज.
भावार्थ-

निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे - परमानुभवामुळे आपण कसे क्षमाशांतिरूप होऊन गेलो याचा काहीसा आत्‍मतृप्तीचा अनुभव ज्ञानेश्वर येथे प्रकट करतात.

परमानुभवामुळे आपण प्रपंचापासून कसे मुक्त होत गेलो आणि क्षुद्र प्रकाश लोपून एका दिव्य प्रकाशाची अनुभूती कशी आली ते येथे अतिशय प्रत्ययकारी रीतीने प्रकट झाले आहे. अर्थात हा अलौकिक प्रकाश इकडेतिकडे कुठेही नाही. परमेश्वरी तत्त्व अन्य कुठे तरी आहे असेही नाही तर लौकिकातून आपले मन काढून घेतल्यामुळे तुझ्यातच देव आहे आणि तूच त्याचा भाव आहेस, हे ध्यान तुला आले. अन्यत्त्वाचा संदेह फिटला. आपलेपणासकट सगळ्या वृत्ती निवृत्त झाल्या- हे तुझे तुला लक्षात आले. त्यामुळेच तू पावन झालास. अर्थात हे समाधान गुरुकृपेमुळेच मिळाले, हे उघड आहे.

एक प्रकारे ज्ञानेश्वरांचा हा आत्मसंवादच आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  लता मंगेशकर