A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरे दुःखी जीवा बेकरार

बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले
अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते

अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको
अकेला तू तुला या जगात समजू नको

मी बदनशीब असा, दुःख मला सामोरी
कहाणी दर्दभरी लोक ऐकती लाखो

हे फूल उमलले नव्हतेची सावली सरली
कुणी ना हात दिला दूर राहिले धनको

तलाश रोज करी ध्यास घेतला पुरता
मला ते प्यार हवे आणखी काही नको
प्रभाकर निकळंकर हे उत्कृष्ट फोटोग्राफी करणारे. त्यांचा 'धनंजय' हा पहिला चित्रपट. चित्रपट झळकल्यावर ते मला एका मिटींगला भेटले कारण ते शिवसेनेचे नगरसेवक होते. मी त्यांना म्हणालो, "काय पुढचं चित्र काढायचा विचार आहे का?"

'शूरा मी वंदिले' हा तो पुढचा चित्रपट. यास संगीत माझं होतं.

चित्राच्या संगीतात नाविन्य असावं, नेहमीच्या मराठीतल्या संगीतातला तोच-तो पणा नसावा हे माझं म्हणणं, माझे पार्टनर निकळंकर यांनाही पटलं. मराठी मंडळींना गजल काय असते तेच माहीत नव्हतं. मग तिला चित्रपटात कोण झळकवणार ? पहिलं, या चित्रपटातलं गाणं 'गजल' असावी. मग सिच्युएशन काय असावी ? निकळंकर म्हणाले, 'आपल्या चित्रात एक झकास कल्पना आहे. हिरॉईनच्या नवर्‍याचा मित्र तो लढाईवर गेल्यावर हिरॉईनकडे येतो नि बोलणं झाल्यावर एक छोटी वही टॅक्सीत विसरतो. तो टॅक्सीवाला तिच्याकडे आणून देतो. ती वही त्याच्याकडे पोहोचविण्यासाठी येते तर तो तिचंच पेंटींग करताना एक गजल गातो, त्यातल्या काही ओळी ऐकून ती तो इरादा बदलते. या सिच्युएशनवर गजल करता येईल. पण गजल गाणार कोण? माझं ठाम मत 'महंमद रफी ! त्या हिशोबाने गजल तयार केली. म्युझिक केलं नि गेलो रफीसाहेबांकडे.

ते रफी व्हिला मध्ये राहत होते वांद्रे येथे. आम्ही गेलो. मी अदाब अर्ज करून म्हटलं, "रफीसाहब हम मराठी पिक्चर में एक गजल शामिल करना चाहते हैं और वो आपको गाना है ।" रफीसाहेब म्हणाले, "मैं मराठीका एक हर्फ भी नहीं जानता, मैं कैसे गाऊं?" त्यांचं वाक्य संपते न संपते तोच उर्दूमध्ये मी लिहिलेला तो कागद त्यांना दाखवला. त्याबरोबर ते नोकराला म्हणाले, "अरे जाओ बाजा लेकर आओ ।" लगेच हार्मोनियम आणली नि माझ्या पुढ्यात ठेवली. मी गजल गाऊन दाखवली. त्याबरोबर ते म्हणाले, "मराठी में इतनी अच्छी गजल होती है?" मी, "जी हाँ, आप के जैसे गानेवाले होते हैं वैसे हमारे जैसे तर्ज बनानेवाले भी होते है ।" रफीसाहेबांच्यासह सगळे हसले. त्या काव्याचा उर्दूमधून अर्थ समजावून सांगितला. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला त्याच्यानंतर लगेच त्यांनी शिकायला सुरुवात देखील केली. हार्मोनियमवर वाजवलेलं प्रत्येक अंतर्‍यापूर्वीचं म्युझिक ऐकल्यावर ते म्हणायचे, "दादा, ये खूबसूरत म्युझिक हैं । इसे मत चेंज किजिये । वैसे ही रखिए ।" मी, "जी हाँ, वैसे ही रखूंगा ।"
या गायकानी इतक्या रिहर्सल दिल्या की दुसर्‍या कुणी दिल्या नसतील. दहा दहा रिहर्सल एका गाण्याला ते द्यायचे !

रेकॉर्डिंगच्या दिवशी मी नि निकळंकर दोघं महालक्ष्मीच्या देवळात गेलो होतो. तिथे पूजा करून जाणार इतक्यात एका वयस्कर अशा पुजार्‍याने बोलावलं नि एका वेगळ्याच लाल रंगाचे फूल माझ्या हातात दिलं. ते माझ्या हातात रेकॉर्डिंग संपेपर्यंत होतं. रेकॉर्डिंग फिल्म सेंटर स्टुडिओत होतं. वादनकारांचा ताफा बराच होता. अनेक मान्यवर मंडळी आली होती. शिवसेना प्रमुखांनी या ध्वनिमुद्रणासाठी नारळ फोडून उद्घाटन केलं होतं. सुप्रसिद्ध छायाचित्रकार जाल मिस्त्री, आय.एस. जोहर, संगीतकार मदन मोहन, सिनेसृष्टीतली कलाकार मंडळी सगळे हजर होते. रफीसाहेब गायकाच्या ध्वनिमुद्रण रूममध्ये गेले. मी, रेकॉर्डिस्ट कौशिक बाबा, मुकुल बोस मंडळी रेकॉर्डिंग रूममधल्या मशीन समोरच्या खुर्च्यांवर बसलो असताना अनिल मोहिले, माझा असिस्टंट आला नि घाईघाईने मला उठवू लागला, "अरे कुठे रे ?" तो म्हणाला, "तुम्ही पहिले चला !" मनात म्हटलं काय झालं असावं? अनिलने वादनकारांच्या ताफ्यासमोर उभं केलं आणि म्हणाला, "देखो ये हैं म्युझिक डिरेक्टर, ये सब इन्होने तैयार किया है, मैंने नहीं !" मी विचारलं, "अनिल हा काय प्रकार आहे?' अनिल म्हणाला, "नाही हो, हे मघापासून बोलताहेत की, कितना अच्छा म्युझिक बनाया है । मला राहवेना म्हणून तुम्हाला घेऊन आलो. काय बर्‍याच ठिकाणी अरेंजर म्युझिक तयार करत असतात ते माझंच असावं म्हणून ते कॉम्प्लिमेंटस् मला द्यायचे. त्यांना पटवून देण्यासाठी मला तुम्हाला आणावं लागलं !"

मला समजत नाही की तो दिवसच चांगला असावा. रेकॉर्डिंग संपल्यावर रफीसाहेब खूष होते कारण सर्वांनाच गाणं आवडलं होतं. नेहमीच्या रिवाजानुसार किती पैसे द्यायचे असं रफीसाहेबांना विचारलं तर ते म्हणाले, "कुछ नहीं, कुछ नहीं, देना हैं तो आप के हाथ में जो खूबसूरत फूल है वो दिजिए ।" मी काही विचार न करता ते फूल रफीसाहेबांना पेश केलं !

ती गझल होती,
बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले
अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते

अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको
अकेला तू तुला या जगात समजू नको

(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.