A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असा कसा देवाचा देव बाई

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।
देव एका पायाने लंगडा ॥१॥

शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।
करी दही-दुधाचा रबडा ॥२॥

वाळवंटी जातो कीर्तन करितो ।
घेतो साधूसंतांशी झगडा ॥३॥

एका जनार्दनीं भिक्षा वाढा बाई ।
देव एकनाथाचा बछडा ॥४॥
ठकडा - ठकबाज, लुच्‍चा.
शिंके - वस्तू अधांतरी ठेवण्यासाठी दोरीची किंवा साखळीची योजना.
मूळ रचना-

असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायानी लंगडा ॥१॥
गवळ्याघरी जातो । दहीदूध चोरुनी खातो । करी दुधाचा रबडा ॥२॥
शिंकेचि तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥३॥
वाळवंटी जातो । कीर्तन करितो । घेतो साधुसंतांशि झगडा ॥४॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥५॥

(नवनीत - लोणी)

भावार्थ-

ही कौतुकाची गवळण आहे असे दिसते. एवढा मोठा देव म्हणवतो पण तो ठकवणारा दिसतो. हा एका पायाने लंगडा आहे कारण तो मायेचा आहे. असा हा मोठा लबाड देव गवळ्याच्या घरी जातो, दहीदूध चोरून खातो. श्रीकृष्णाची ही लीला तर्कापलीकडची आहे. ते खात असताना दह्यादुधाचा अगदी रबडा करून टाकतो. गडबडीत शिंके तोडून टाकतो, मडकं फोडतो. मग लोण्याचा सगळा सडा पडतो. गोकुळचा हा नंदलाल गोपगोपींना अगदी रंजीस आणतो. पण हे लोभस रूपडे डोळ्यासमोरून थोडे जरी बाजुला झाले तरी चैन पडत नाही असे पुराणात म्हटले आहे. त्या भगवान श्रीकृष्णाचे रूप विठ्ठलात पाहणारे वारकरी त्याच्या दर्शनासाठी लांबलांबून येतात. त्यांच्या प्रेमामधे फरक तो काय? किंबुहुना पुराणपूर्व काळातले ते गोकुळवासीच आता वारकरी म्हणून पुनर्जन्‍म पावले की काय असे वाटते. त्या वैष्णवांच्या मेळ्यात हा जातो आणि समरस होतो. त्यांनी केलेले परमेश्वराचे वर्णन ऐकतो आणि आपणही त्यांच्याशी चढाओढ स्पर्धा करतो. साधुसंत त्याला पाहतात आणि तो साधुसंतांची चाह करतो. असा हा झगडा चालतो तो प्रेमाचा. अशी ही चढाओढ चालते. मी वैकुंठात रहात नाही, मी योग्यांच्या हृदयातही रहात नाही. माझे भक्त जिथे कीर्तन करतात, गायन करतात तिथे मी वसति करतो, असे भगवंतांच्या तोंडचे संस्कृत वचन प्रसिद्ध आहे. तो वाळवंटी कीर्तन करतो आणि कदाचित त्यामुळेच गोपगोपींच्या प्रेमाने दह्यादुधाचा रबडा करत असावा. त्यांच्या केवळ प्रेमाखातर तो तीन गुणांचे शिंकाळे फोडतो. जे योग्यांना जन्मोजन्म तपस्या करून साधत नाही ते त्रिगुणातीत होणे, गोपगोपींना केवळ भगवंतावरील त्यांच्या प्रेमाने तो साध्य करून देतो. मडके फोडतो म्हणजे आत्म्याला असलेली देहबुद्धी जाते. म्हणून लाडाने आणि कौतुकाने देव एकनाथाचा बछडा आहे, असे एकनाथ महाराज म्हणतात.

व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई