A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशक्य तों तुह्मां नाही

अशक्य तों तुह्मां नाही नारायणा ।
निर्जिवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे ।
आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥

थोर भाग्य आह्मी समर्थाचे कांसे ।
ह्मणवितों दास काय थोडें ॥३॥

तुका ह्मणे माझे निववावे डोळे ।
दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥

शंखचक्रगदापद्म ।
पैल आला पुरुषोत्तम ॥५॥

ना भी ना भी भक्तराया ।
वेगीं पावलों सखया ॥६॥

दुरूनि येतां दिसे दृष्टी ।
धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥

तुका देखोनि एकला ।
वैकुंठीहूनि हरि आला ॥८॥