आम्हीही सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !
शिवरायाच्या दरबारी त्या, युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित झाली हरिणीसम ती रती !
वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रम्य अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभु माता मानिती !
अलंकार ते वस्त्रभूषणे देऊन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतून शब्द अजून येती !
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी |
गीत प्रकार | - | आई, भावगीत, प्रभो शिवाजीराजा |
टीप - • 'गीत शीवायन' या रंगमंचीय कार्यक्रमातून. |
'अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती' या गाण्याची जन्मकथा सांगण्यासारखी आहे. त्याकाळी मधुकर जोशी हे डोंबिवलीला विष्णूनगर भागात राहायचे. लहानसं घर होतं त्यांचं. एकदा मी त्यांच्या घरात प्रवेश केला तर दारातच एक कागद पडलेला दिसला. उचलून बघतो तर त्यावर एक कविता लिहिलेली होती. आता कवीच्या घरात दुसरं काय मिळणार म्हणा ! मनात म्हंटलं, या कवीचा जबाब नाही. घरामध्ये काव्यंच काव्य लोळत पडलीत. त्या कागदावरचे शब्द सहज कुतूहल म्हणून वाचले. मला ते एकदम आवडले. मी त्यांना म्हंटलं, "अहो कविराज, हे इतकं सुंदर काव्य आहे ते जपून ठेवायचं तर इथे धुळीत पडलेलं दिसतंय. हा काय प्रकार आहे?"
मधुकर जोशी म्हणजे स्वभावने अगदी साधे व गरीब. ते म्हणाले, " अहो, काय झालं की माझ्या वहीतून हे कागद माझ्या लहान मुलाने फाडलेले आहेत. त्या लहान मुलाला काय समजतंय् हो त्याचं महत्त्व?" मी म्हणालो, "ते कागद माझ्या हाती लागले हे बरंच झालं नाहीतर त्याचा उपयोग दुसर्याच कामाकरिता झाला असता. आता नशिबाने ते वाचले आहे तर नीट सांभाळून ठेवा. अन् हे बघा ! हे काव्य वाचल्याबरोबर एक चाल सुचली आहे. तुम्ही कवी आहात. तुमच्या घरात वाजवायची पेटी नसेलच. कुणाकडून तरी मागून घ्या." मधुकर जोशींनी शेजार्यांकडून पेटी आणली. माझ्यापुढे ठेवली व म्हणाले, "ऐकवा आता चाल." मी मनात दाटलेल्या स्वरांना संघटित केलं व गाण्याला मूर्त स्वरूप आलं. एका अलौकिक गाण्याचा जन्म तिथे झाला.
मधुकर जोशी यांची अनेक गाणी मी रेकॉर्ड केली ती खूप गाजली. जसे-
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे..
झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात..
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार..
आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे..
मधुकर जोशींची गीतं खरंच चांगली आहेत. म्हणूनच मला उत्तम चाली सुचल्या.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.