A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अष्टविनायका तुझा महिमा

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम्‌ ।
लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्‍नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामो रांजण संस्थित: गणपति: कुर्यात्‌ सदा मंगलम्‌

जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन
काळजात सिंहासन, मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना

अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा

गणपती पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी-कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा

गणपती दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंडेचं नवल केलं सार्‍यांनी
विस्तार याचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा

गणपती तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर
विष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवल झालं, टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभार्‍याला पितळेचं मखर
चंद्रसूर्य-गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा

गणपती गणपती ग चौथा गणपती
बाई रांजणगावचा देव महागणपती
दहा सोंड वीस हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन, डोळं भरून दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं, किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा

गणपती पाचवा, पाचवा गणपती
ओझरचा विघ्‍नेश्वर लांबरुंद हाये मूर्ती
जडजवाहीर त्याचं, काय सांगू श्रीमंती
डोळ्यामंदी माणकं हो, हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरती हो सारा बघुन सोहळा
चारी बाजू तटबंदी, मधी गणाचं मंदिर
विघ्‍नहारी विघ्‍नहर्ता स्वयंभू जसा

गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी, नदीच्या तीरी
गणाची स्वारी, तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव
जमती इथं रंकासंगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानं पाठी आशीर्वाद केला हो
पुत्रानं पित्याला जल्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धावुनी आला हो
खडकात केलं खोदकाम, दगडाचं मंडपी खांब
वाघ-सिंह-हत्ती लई मोठं, दगडात भव्य मुखवटं
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन्‌ गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रूप देवाचं लेण्याद्री जसा

सातवा गणपती राया
महड गाव अति महशूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई साधंसुधं, जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं हाये तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या, प्रसन्‍न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा

आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा, आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख, सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडीचे रूप साजिरे, कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती, देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्‍नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया
गाभारा - देवालयात देवाची मूर्ती असते तो अंतर्भाग.
चिरेबंदी - मजबूत
मधु-कैटभ - मधु व कैटभ हे विष्णू निजला असता त्याच्या कानातून उत्‍पन्‍न झाले. हे ब्रह्मदेवास भक्षणार होते, इतक्यात विष्णूने त्यांना ठार मारले.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर, मल्लेश