A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवघा रंग एक झाला

अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असोनि विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दूरी ।
ह्मणे चोखियाची महारी ॥५॥
विदेहस्थिति - देहाचे भान विसरवणारी, मुक्त अशी अध्यात्मिक (ज्ञानी) अवस्था, निर्विकल्प.
किशोरीताई : अभिजात अभिसारिका !
संकीर्ण - श्रद्धांजली

एखाद्या राज्याच्या किंवा राष्ट्राच्या आध्यात्मिक व वैचारिक प्रगतीत आणि त्याच्या सांस्कृतिक परंपरेला भव्यतेच्या शिखरावर नेण्यात अभिजात कलांच्या काही विशेष साधकांचं योगदान इतकं सर्वव्यापी ठरतं की, त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. त्यांच्या साधनेतून व तपश्चर्येतून त्यांच्या सादरीकरणाला अलौकिकतेची झळाळी येते. त्या झळाळीत समाजावर संस्कार करण्याची क्षमता असते, दिशाहीन झालेल्यांना मार्ग दाखवण्याची ताकद असते.

महाराष्ट्र हे संयुक्त राज्य होण्याच्या २० वर्षं आधी म्हणजेच १९४० च्या दशकात किशोरीताईंच्या स्वरसाधनेचा प्रारंभ झाला आणि महाराष्ट्राच्या जन्मापासून म्हणजेच १९६० सालापासून ताईंनी आपल्या स्वर-कार्यातून संगीतातली अभिजातता जपली. त्यांनी संगीत क्षेत्रात एक प्रकारची स्वर-क्रांतीच घडवून आणली असं म्हणायला हरकत नाही. आपल्या घराण्याच्या आणि कलेच्या परंपरेशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या कौशल्याने काही जुन्या व कर्मठ रूढींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले, नवे व सर्वव्यापक सिद्धान्त प्रस्थापित केले. या नव्या सिद्धान्तांना सर्व स्थरांवर मान्यता मिळाली. हे सिद्धान्त निव्वळ प्रतिभेच्या जोरावर नव्हे तर प्रतिभेसोबत ताईंच्या कारकिर्दीतील अनुभवसमृद्धीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित झाले होते. त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारशक्तीतून हे नवे सिद्धान्त आधी स्वतःच्या सादरीकरणात उतरवले आणि तावून-सुलाखून आजमावल्यावरच आपल्या अनुभवांचं तात्पर्य मांडलं. या नव्या सिद्धान्तांनी प्रचलित व भावी पिढीला नवी दिशा दाखवली, नवे मार्ग मोकळे करून दिले. अशा नव्या मार्गावर घडणार्‍या कलेच्या प्रवासामुळेच राज्याचा सांस्कृतिक दर्जा उंचावतो आणि काही प्रमाणात, प्रादेशिक व राष्ट्रीय मर्यादा ओलांडून, तो विश्वव्यापकदेखील ठरतो.

किशोरीताईंसारख्या गुणवान कलाकाराचं योगदान हे परिमाणवाचक किंवा मात्रात्मक नसून ते गुणदर्शक किंवा आत्मिक असतं. म्हणूनच त्याचं आकड्यांमध्ये मोजमाप होऊ शकत नाही. आपल्या मनाची कवाडं जर खर्‍या अर्थानं उघडी असतील तर अशा दैवी योगदानाचे सुखद परिणाम आपण त्या कलाकाराच्या शिष्यांच्या व भावी पिढीतील इतर काही कलाकारांच्या सादरीकरणात व विचारांमध्ये पाहू शकतो, ऐकू शकतो, अनुभवू शकतो. ताई जेव्हा आपली कला सादर करतात, तेव्हा त्या क्षणांचा अनुभव म्हणजे जणू दिव्यत्वाचा परीसस्पर्शच. माध्यमाचं कौशल्य न दाखवता त्यांनी माध्यमामागच्या हेतूकडे लोकांचं लक्ष वळवलं. या व अशा काही इतर सिद्धींमुळे त्यांचं कार्य हे निव्वळ आनंददायी न राहता ते योगदानात्मकदेखील होतं.

ताईंच्या गाण्याचे श्रोत्यांवर सात्त्विक परिणाम होतात. गाताना त्या फक्त आपल्या गळ्याचं कौशल्य दाखवत नाहीत, तर त्या कौशल्याच्या माध्यमातून श्रोत्यांसमोर साक्षात त्या रागाचं वातावरण उभं करतात, श्रोत्यांना त्या रागाचं दर्शन घडवतात. एखादा राग आपल्याला जसा, जितका समजलाय तो फक्त तसा, तितकाच न गाता, तो मुळात जसा आहे तसाच्या तसा गाण्याचं आणि त्याचं विश्वव्यापक स्वरूप लोकांसमोर सादर करण्याचं संस्काररूपी तत्त्व ताईंना त्यांच्या गुरूरूपी आईंकडून मिळालं. त्या तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत निवेदकाने जेव्हा ताईंना त्यांच्या एखाद्या अविस्मरणीय मैफिलीबद्दल विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या, "माझा कुठलाही राग अविस्मरणीय झालाय असं मला वाटत नाही. माझा राग अतिशय अप्रतिम झाला असं मी कधीच म्हणू शकत नाही. पण कधी कधी एखादा राग गायल्यावर मला जेव्हा असं वाटतं किंवा असं जाणवतं की, त्यात नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने स्वर-रचना केली तर त्याचं अस्तित्वात असलेलं अजून एखादं व्यापक असं भावविश्व अनुभवता येईल, तेव्हा तो राग माझ्यासाठी अविस्मरणीय ठरतो. कारण त्यावर अजून साधना करून त्यात दडलेल्या त्या नव्या भाव-विश्वापर्यंत मी पोचू शकते, त्याचा अनुभव घेऊ शकते. पूर्वी मी माध्यमातलं कौशल्य दाखवत असे, आता मी त्या रागाच्या वातावरणाच्या अधिक जवळ जाऊ शकते कि नाही एवढंच पाहते. माध्यमावर प्रभुत्व एकदाच मिळवायचं असतं, पण भाव जेव्हा प्रत्येक वेळी नवनवीन रूपं धारण करून येतो, तेव्हा त्याला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. कुठल्याही कलेचा भावनेशी निगडीत संबंध असतो. कला ही मुळातच भावनिक असते. भावाचं अत्युच्च दर्शन घडवणारी कला म्हणजे रागसंगीत. ज्याला सर्व कलांमध्ये सर्वोच्च असण्याचा मान मिळालाय. इट इज द फाईनेस्ट ऑफ ऑल आर्ट्स. मग त्यातलं सुक्ष्मत्व पहायला नको का? ते सुक्ष्मत्व फक्त माध्यमाची कसरत करून नाही समजणार. राग म्हणजे भाव असतो. ती मनाची एक आंतरिक अवस्था असते, जिला आपण गाऊन अभिव्यक्त करतो. त्यामुळे राग म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी मी रागशास्त्र, रागसाधना, रागगायन, रागनाट्य, रागरस आणि रागसत्य या रागाच्या वेगवेगळ्या भूमिकांचा आणि संकल्पनांचा अभ्यास केला. रागगायन हे स्वतःच्या आत्म्याला ओळखण्यासाठी करायचं असतं, त्याच्याशी इतरांचा काही संबंध नसतो. आपण ज्याला मैफल म्हणतो, जिथं आपण श्रोत्यांना राग ऐकवतो, ते म्हणजे रागनाट्य असतं आणि तिथं कलाकार व श्रोत्यांमध्ये रागरस नावाचं एक नातं निर्माण होतं, ज्याला आपण नाट्यरस म्हणतो. हे सगळं आणि मुळातच रागशास्त्र समजण्यासाठी रागसाधना लागते. साधनेतून साध्य होणारा राग, जो त्याच्या स्वरांमागे दडलेल्या वातावरणाशी आपली ओळख करून देतो, तो कलेच्या अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा मार्ग असतो. त्यालाच रागसत्य म्हणतात. स्वरभाषेच्या साधनेचा हा मार्ग अतिशय कठीण आहे. या मार्गावर प्रवास करूनच मी आज इथवर पोचले अन या मार्गावर चालण्याचं आव्हान जे स्वीकारतात, त्यांचं मी मनापासून कौतुक करते."

ताईंच्या या व इतर काही तत्त्वांशी युवा कलाकार सहमत आहेत असं जाणवतं. गेल्या काही वर्षांत अनेक युवा कलाकारांच्या मैफिलींमध्ये टाळ्या मिळवण्यासाठी केला जाणारा सरगमचा वापर प्रकर्षाने टाळला जातोय. जे व्यक्त करायचंय किंवा जे विधान मांडायचं ते सरगममध्ये किंवा शब्दांची मोडतोड न करता संपूर्ण आकारात्मक सुरातून किंवा आलापी गाऊन मांडायचा प्रयत्‍न फक्त ताईंचे शिष्यच नव्हेत तर इतर काही कलाकारदेखील आवर्जून करताना दिसतात.

ताईंच्या मते जशी माणसांची भाषा असते, पशु-पक्ष्यांची भाषा असते, तशी स्वरांचीदेखील भाषा असते. ज्यात स्वर साहित्य असतं. तिला स्वरभाषा असं म्हटलं पाहिजे. जो कलाकार आपल्या स्वर गायनातून भाव व्यक्त करून ऐकणार्‍यांच्या मनाला साम्यावस्थेत आणू शकतो, तो कधीही स्वरांचा नोटेशनने उल्लेख करत नाही. जो स्वराला आतून ओळखतो, तो त्या स्वराला अक्षरानं साद घालणार नाही. एखादी फ्रेझ सरगममध्ये गायल्यावर तीच जर आकारात गाऊन पाहिली तर त्याचा संपूर्णतः स्वभाव बदलल्याचं आपल्या लक्षात येतं. स्वर हा बिंदू असतो, ज्याला आस असते. सूर्याचे किरण जसे पसरतात, तशी स्वराची आस पसरते. अक्षरांच्या उच्चाराचा स्वभाव हा खुंटणारा असतो. त्यामुळे अक्षरांच्या माध्यमातून जेव्हा स्वर गायला जातो, तेव्हा त्याची आस तुटते, ती पसरत नाही. या तत्त्वाचं पालन करत ताई आपल्या गाण्यातला भाव हा प्रवाही सुरांच्या माध्यमातून व्यक्त करतात. पूर्णपणे संलग्‍न असलेल्या स्वरांचं विश्व निर्माण करून त्यातून भावाचं दर्शन घडवतात. फक्त शास्त्रीय गायनातच नव्हे तर सुगम आणि भक्ती संगीत गातानादेखील त्यांनी हे तत्त्व कटाक्षानं पाळल्याचं आपल्या लक्षात येतं. सुगम संगीतातला हळुवार शृंगार आणि भक्तीरसातली समर्पणाची भावना त्यांनी शब्दांच्या सोबत संपूर्ण आकारात्मक सुरांच्या सहाय्याने व्यक्त केली आहे. त्यांनी गायलेलं एकमेव चित्रपट गीतसुद्धा त्यांच्या एका अतिशय एक्स्प्रेसिव्ह आलापानं सुरू होतं. जो आलाप ऐकून असं वाटतं की, अशा गायकीने फक्त माणसालाच नव्हे तर दगडालादेखील पाझर फुटेल. त्याचक्षणी त्या गीताचे शब्द समोर येतात – 'गीत गाया पत्थरोने'!

२००२ साली मला ताईंना भेटण्याची संधी मिळाली. नुसतीच भेटण्याची नव्हे तर त्यांच्या कार्यक्रमात त्यांना साथ करण्याची संधी मिळाली. २२ नोव्हेंबर २००२ ला मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरच्या सभागृहात ताईंनी स्वरबद्ध केलेल्या मीरेच्या भजनांची 'मगन हुई मीरा' नावाची मैफिल झाली होती. त्यासाठी दोन महिने आधी, सप्टेंबर महिन्यापासूनच ताईंच्या घरी रिहर्सल सुरू झाली. ताईंना पायपेटी म्हणजेच ऑर्गनची साथ हवी होती, पण रोज रिहर्सल करायला ऑर्गनसारखं मोठं आणि जड वाद्य वापरणं गैरसोईचं झालं असतं. म्हणून रिहर्सल पुरती त्यांना की-बोर्डची साथ हवी होती. व्हॉयोलिनिस्ट मिलिंद रायकर मला त्यांच्याकडे की-बोर्डची साथ करण्यासाठी घेऊन गेले. मला अजूनही तो दिवस आठवतो. जेव्हा मी पहिल्यांदा ताईंना प्रत्यक्षात पाहिलं, अविस्मरणीयच क्षण होता तो माझ्यासाठी. ताईंना साथ करायची म्हटल्यावर मी त्यांची असंख्य वेळा ऐकलेली 'म्हारो प्रणाम' ही मीरा भजनांची ध्वनिफीत पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक ऐकली. सगळी गाणी त्यांच्या स्वररचने सकट आणि कॉर्ड सेक्शन सकट की-बोर्ड वर बसवली, विशेष करून यमन कल्याणमध्ये बांधलेलं 'म्हारो प्रणाम' हे भजन, जे सर्वांत आधी ताईंनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. रिहर्सलच्या पहिल्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की, ताईंसारख्या कलाकाराला साथ करायची असेल तर फक्त त्यांच्या ध्वनिफितीमधलं फ्रेझिंग बसवून उपयोग नाही तर त्यांना त्याक्षणी यमन कल्याणचं जे अमर्याद भावचित्र दिसतं, ते त्यांच्या पाठोपाठ आपल्यालाही पाहता आलं पाहिजे. त्यांच्या प्रतिभेचा झरा ज्या दिशेला वाहू लागेल, त्या दिशेला आपल्याला आपली पाऊलं तत्क्षणी वळवता आली पाहिजेत.

'म्हारो प्रणाम बाके बिहारी जी' या शब्दांचा भावार्थ समजावून सांगणारा रोज नवा यमन कल्याण मी ऐकत होतो. त्या दोन महिन्यांत ताईंनी आम्हाला त्यांनी स्वरबद्ध केलेली काही प्रकाशित व काही अप्रकाशित अशी एकूण १८ भजनं शिकवली. मीरेने समर्पणात्मक भक्तीतून जो आनंद अनुभवला, तोच आनंद ताईंच्या प्रत्येक चालीतून व्यक्त होत होता. प्रत्येक चाल इतकी परिपूर्ण होती की, त्यातून मीरेच्या साहित्यात दडलेली तिची कृष्णभेटीची उत्कंठा ओथंबून वाहत होती. मला 'म्हारो प्रणाम' सोबत विशेष भावलेली काही भजनं म्हणजे 'भई हूँ बावरी', 'कोई कहियो रे प्रभु आवन कि', 'प्रभुजी मैं अरज करू', 'सहेलियाँ साजन घर आये', 'बदरा रे', 'पग घुंगरू बाँध मीरा नाची रे', 'जोसीड़ा ने लाख बधाई' अणि 'चाला वाही देस'.

प्रत्येक भजनाच्या चालीत नव-निर्मितीचा खजिना भरलेला होता. या चालींच्या आधारे आपल्या गायकीतून ताई मीरेच्या भक्तिमय रस-विश्वाच्या खोलवर जाऊन तिथं दडलेल्या अस्पृश्य स्पंदनांना जागृत करायच्या. ही स्पंदनं आधी हृदयाला भिडायची आणि मग बुद्धीला पटायची. 'टू एक्सप्लोर द अनएक्सप्लोर्ड' म्हणजे नेमकं काय हे मला तेव्हा कळलं. त्याक्षणी मला जाणवलं की, शास्त्रीय संगीतासोबत ताईंनी सुगम आणि भक्ती संगीतातही किती श्रीमंत काम करून ठेवलंय !

कुठलाही शास्त्रीय गायक हा संगीतकारही असतोच, कारण त्याला स्वर-रचना करतच राग मांडावा लागतो. पण एखाद्या काव्याला चाल लावणं, विशेष करून संतकाव्याला, हे थोडं वेगळं गणित असतं. भाव व्यक्त करताना त्यातील व्याकरण, छंद, यमक, ताल आणि शब्दांच्या उच्चारांचाही विचार करावा लागतो. ताईंच्या मीरा भजनांसोबत त्यांनी स्वरबद्ध केलेले 'या पंढरीचे सुख', 'अवघा तो शकून', 'जनी जाय पाणीयासी', 'अवघा रंग एक झाला', 'कानडा विठ्ठल', 'जनी म्हणे पांडुरंग', 'पडिले दूर देशी', 'ऐसा वर देई हरी' आणि विभास व तोडी संमिश्र करून रचलेला 'बोलवा विठ्ठल', हे सारे अभंग म्हणजे संगीतकारांसाठी, सुगम गायनात शाश्वत काम करण्याची इच्छा बाळगणार्‍या गायकांसाठी ज्ञानाची खाणच आहे.

क्लासिकल आणि सुगम संगीतासोबत संगीत-दिग्दर्शनाच्या क्षेत्रालाही ताईंनी वर नमूद केलेल्या कलाकृतीतून केवढं मोठं योगदान दिलंय हे आपल्या लक्षात येईल.

गेल्या दहा-अकरा वर्षात मी त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. मुंबईत झालेल्या बहुदा त्यांच्या प्रत्येक मैफिलीला हजेरी लावली. काही महिन्यांपूर्वी सायंकाळी त्यांच्या प्रभादेवीच्या निवासस्थानी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ताईंकडे रागसंगीत शिकणारा माझा मित्र आणि तरुण पिढीचा आश्वासक गायक मंगेश बोरगावकर माझ्यासोबत होता. त्याने काही दिवसांपूर्वी माझ्या खाजगी अल्बम्समधली काही खास गाणी ताईंना ऐकवली होती. त्यादिवशी दोन तास ताईंशी संगीतविषयक मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्या भरभरून बोलल्या.

संगीतातलं क्लासिसिझम म्हणजे नक्की काय हा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यावर ताईंनी स्पष्टीकरण दिलं, "सप्तकातले सूर सुरात गाणं किंवा त्याचं सुरेल सादरीकरण करणं म्हणजे क्लासिसिझम नव्हे. सरगमवर प्रभुत्व मिळवून त्याचा दिखावा करणं म्हणजे क्लासिसिझम नव्हे आणि नुसत्या एका मागोमाग एक दाणेदार ताना गळ्यातून गाऊन दाखवणं हेदेखील क्लासिसिझम नव्हे. आपलं गाणं हे हृदयस्पर्शी हवं. आपण जे गातो ते जर श्रोत्यांच्या हृदयाला भिडलं, त्यांच्या मनाला भावलं आणि त्यांच्या बुद्धीला पटून जर त्याला सर्वत्र मान्यता मिळाली तर त्याला आणि फक्त त्यालाच मी क्लासिसिझम असं म्हणेन." गप्पांचा ओघ पुढे संगीत दिग्दर्शनाकडे वळला, म्हणजेच म्युझिक कंपोझिंगकडे. मी त्यांना विचारलं, "ताई, तुम्ही स्वतः इतक्या उत्तम संगीतकार आहात. त्या सर्व अभंगांच्या चाली तुमच्या अंतर्मनातून जन्मल्या आहेत हे लक्षात येतं. त्या चाली नुसत्या पेटीवर स्वर वाजवून रचलेल्या नाहीत. ही किमया कशी घडते? त्या चाली बांधताना नेमका काय विचार केलात?" त्यावर त्या म्हणाल्या, "काव्याला चाल लावणं म्हणजे त्यातल्या अर्थाला स्वरात व्यक्त करणं. त्यासाठी नुसतं शब्दांना उचलून स्वरांवर चिकटवण्याऐवजी मी माझ्या स्वर-भाषेतला अर्थ काव्याच्या अर्थाशी समांतर आहे का हे शोधण्याचा प्रयत्‍न करते. आधी स्वरांमधून उत्पन्‍न होणारा भाव समजण्याचा प्रयत्‍न करावा आणि तो जर काव्यातल्या भावाशी जुळत असेल तर त्या सुरांमध्ये ते काव्य आपोआप मिसळेल आणि त्याला उत्तम चाल लागेल. आणि खरं सांगू का, 'अ ट्रू कॉमपोझिशन इज नेव्हर मेन-मेड'. आपण काहीच करत नसतो. सगळं आपल्या हातून आपोआप घडत असतं. आपल्याला फक्त सगळं काही आपणच करत असल्याचा भास होत असतो. जेव्हा या गोष्टीची जाणीव होऊन हा प्रश्‍न पडतो की, आपण काहीच न करता हे एवढं सगळं कसं काय घडलं, तेव्हा ईश्वरीय शक्ती म्हणजे काय ते समजतं. गेली ५० वर्षं भूप गायल्यावरही आज जेव्हा मी भूप गायला बसते, तेव्हा अशी एखादी फ्रेझ येऊन जाते, जी या आधी मी कधीच पाहिली नव्हती. मग ही फ्रेझ नेमकी कुठून आली? ती या आधी मला का दिसली नाही? हे असं घडल्यावर लक्षात येतं की, हे सारं काही अतिभौतिक आहे. म्हणूनच मला कधी कधी असंही वाटतं की, मी काहीच करू शकले नाही. स्वरांचं विश्व हे अप्राप्य आहे आणि ते अप्राप्यच राहतं. ते कोणाच्याच हाती लागत नाही."

स्वरविश्व जरी अप्राप्य असलं तरी ताईंच्या सुरातून निर्माण होणारा आनंद गेली ५१ वर्षं महाराष्ट्राच्या भूमीने प्राप्त केला. या महान स्वर-साधिकेचं कार्य महाराष्ट्राच्या भूमीत झालं हे खरं तर महाराष्ट्राचं भाग्य. आपल्या तंत्रशुद्ध तरीही सात्त्विक, मधुर आणि भावपूर्ण अशा सुरांचं दान त्यांनी या भूमीला दिलं. आपल्या शिष्यांना त्यांनी भरभरून ज्ञान दिलं, प्रेम दिलं. त्यांची गायकी अजेय आहे, अजोड आहे. मैफिलीच्या आधी आणि नंतर ताई श्रोत्यांना वाकून नमस्कार करत, पण आता आपण सारे त्यांच्या संगीताचे चाहते मिळून त्यांनी केलेल्या अभंग योगदानाची जाणीव ठेवून या अभिजाततेच्या अभिसारिकेला वंदन करूया.

( हा लेख दोनेक वर्षांपूर्वी दै. 'नवशक्ती'मध्ये प्रकाशित झालेला लेख आणि साईनिर्णय दिवाळी अंकासाठी किशोरीताईंची घेतलेली मुलाखत या दोन्हींच्या संमिश्र संपादनातून साकारला आहे. तो लेखकाच्या पूर्वपरवानगीने प्रकाशित करत आहोत.)
(संपादित)

निलेश मोहरीर
सौजन्य- अक्षरनामा (aksharnama.com) (६ एप्रिल, २०१७)
(Referenced page was accessed on 22 July 2020)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.