A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भाग्यवती मीं त्रिभुवनिं

भाग्यवती मीं त्रिभुवनिं झाले । कुबेर माझा धनी ॥

तुझेच सारे वैभव येथे । मी नावाचा धनी ॥

दो दिवसाचे वैभव खोटे ।

मोल तयाचे जगास वाटे ।

तुम्हावाचुनी मातीमोल हे । नकोच असले जिणे ।

करितील हेवा सारे नवरे । पाहुनि माझे जिणे ।

भाग्यवती मी तुमची राणी ।

भाग्यवान मी नवरा म्हणुनी ।

जोवरि लाभे प्रेमाचे धन । पर्णकुटीही बरी ।

मानिसी ऐसे वाटे होइल तुझा कुबेर भिकारी ॥
कुटिर (कुटी) - झोपडी.
रंगभूमीचा पुनर्जन्य !

'आशीर्वाद' नाटकानंतर रंगभूमीवर आलेल्या 'कुलवधू' नाटकाने 'नाटय-निकेतन'वी बैठक स्थिर केली. मात्र त्या नाटकाचा पहिला प्रयोग ठरलेल्या तारखेला होऊ शकला नाही. गांधीजींची नऊ ऑगस्टची चळवळ आणि 'कुलवधू'च्या पहिल्या प्रयोगाची तारीख एकच होती. त्यानंतर त्याच्या पुढल्या आठवड्यातही एकंदर तंग राजकीय वातावरणामुळे नाटक रंगभूमीवर आले नाही. ते रंगभूमीवर आले ता. २३ ऑगस्ट १९४२ रोजी. रॉयल अपरा हाऊसमध्ये या नाटकाच्या झालेल्या पहिल्या प्रयोगाने मुंबईच्या प्रेक्षकांवर विलक्षण छाप पाडली. विशेषतः मा. कृष्णरावांनी या नाटकाला दिलेले श्रवणमधुर संगीत आणि सौ. ज्योत्‍स्‍ना भोळे यांनी केलेली नायिकेची भूमिका याची प्रेक्षक तोंड फाटेपर्यंत स्तुती करू लागले.

'स्वयंवर' नाटकानंतर मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचा हा दुसरा टप्पा, असा नाट्यरसिकांचा अभिप्राय पडला. या नाटकात फक्त सहा गाणी आहेत, पण नाटकाच्या एकंदर कथानकात आणि वातावरणात ती एवढी 'फिट' बसली, की या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. 'बोला अमृत बोला' ही या नाटकातली भैरवी तर अजरामर झाली.

मुंबईपेक्षाही पुण्याने या नाटकाचे जे कौडकौतुक केले, त्याला सीमा नाही. ऐन पावसाळ्यातही या नाटकाचे कोणत्याही दिवशी 'हाऊसफुल्ल' प्रयोग होत असत. आज जेथे भानुविलास थिएटर आहे, तेथे कै. लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीने किनतानाचे एक कच्चे थिएटर उभे केले होते. पावसाने प्रेक्षागृहात चिखल होत असे. पण पुण्याचे रसिक प्रेक्षक तीन-साडेतीन तास 'कुलवधू' नाटक पाहत रंगून जात असत. वर्षभर फक्त पुण्यात या नाटकाचे आठवड्यातून दोनदोन, तीनतीन प्रयोग होत होते. पुण्यात थोर पुरुषांची एकसष्टी साजरी होत असे, त्या प्रथेला अनुसरून 'कुलवधू'चीही एकसष्टी कै. वामन मल्हार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली !

या नाटकाचे आतापर्यंत दोन हजारांवर प्रयोग झाले असतील. जेथेजेथे मराठी माणूस राहत होता, तेथपर्यंत 'नाट्य-निकेतन'चे नाव या एकाच नाटकाने नेऊन पोचवले. 'नाट्य-निकेतन' संस्था निघण्यापूर्वी मराठी रंगभूमी मृत झाल्यासारखी होती, तिला 'कुलवधू' ने पुनर्जन्म दिला, असे त्यावेळी नाट्यरसिक मनमोकळेपणाने म्हणत असत.

या नाटकामुळे ज्योत्‍स्‍ना भोळे यांच्याबरोबर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते यांचेही नाव नाट्यरसिकांच्या तोंडी खेळू लागले. वास्तविक, गणपतराव मोहिते बलवंत संगीत मंडळीत अनेक वर्षे ​नायिकेच्या भूमिका करीत असत. पण त्यांना खरे यश प्राप्‍त झाले 'कुलवधू'मधील देवदत्ताच्या पुरुष भूमिकेत. त्यांच्याप्रमाणेच कै. व्ही. डी. पंडीत यांची बाप्‍पाची या नाटकातील भूमिका अजरामर झाली. वास्तविक कै. पंडीत हे मूळचे नकलाकार. पण या नाटकाने नट म्हणून त्यांना अपरंपार कीर्ती मिळवून दिली. त्यांची 'काय मालक !' ही ललकारी ऐकताच प्रेक्षकांत हमखास प्रचंड हशा होई. ही भूमिका त्यांच्या एवढी रोमरोमात भिनली होती की, नंतरच्या कित्येक नाटकांतून ते करीत असलेल्या भूमिकांनाही या बाप्पाच्या भूमिकेचा वास येई.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' (लेखन सहकार्य जयवंत दळवी) या पुस्तकातून.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्‌, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर अविनाश, ज्योत्‍स्‍ना भोळे