A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भान हरी हा

भान हरी हा । मोहि नयना मना ॥

जिंकोनि अबला, तनु रोमरोमीं ।
सत्ताबलानें विहार करी हा ॥

नयनांत खेळे; श्रवणांत बोले ।
हृदयांत डोले प्राणसखा हा ॥
गीत - वीर वामनराव जोशी
संगीत - वझेबुवा
स्वर- बापू पेंढारकर
नाटक - राक्षसी महत्वाकांक्षा
राग - मांड
ताल-दादरा
चाल-छागयो तेरें नयनो में राम
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी
'राक्षसी महत्त्वाकांक्षा' या नाटकाची मूळ कल्पना उर्दूतील एका 'खूबसूरत बला' या नांवाच्या नाटकावरून सुचलेली असून, त्यामध्ये उद्धाटण केलेल्या 'वफादारी'च्या तत्वाला मूलभूत धरून 'राक्षसो महत्त्वाकांक्षा श्रेष्ठ का दैवी महत्त्वाकांक्षा श्रेष्ठ' या सूत्राच्या आधारे या नाटकाची स्वतंत्र मांडणी केलेली आहे. माझा नाटककार या नात्याने समाजापुढे येण्याचा पहिलाच प्रसंग असल्यामुळे ग्रंथाच्या लोकप्रियतेसंबंधानें माझें मन नववधूप्रमाणें सलज्ज व साशंक होत आहे. तथापि आपण आपल्याच माणसांत वावरणार आहोंत व ती आपणांला आपले सर्व दोष पोटांत घालून प्रेमळपणाने वागवून घेतील अशी त्या नूतन विवाहित बालिकेप्रमाणे माझ्या संकोचित मनाला आंतून जाणीव असल्यामुळे, मी समाजापुढें येण्याचें घाडस केले आहे. परमेश्वर ही माझी धाडसाची उमेद सफल करो !

'राक्षसी महत्त्वाकांक्षे'ने मराठी रंगभूमीवर आपले तांडव सुरूं केल्यासून 'तिच्या आसुरी नृत्या'संबंधानें रसिक व मर्मज्ञ टीकाकारांनी प्रेमळपणानें आपले अनुकूल-प्रतिकूल अभिप्राय खाजगी रीतीने व वृत्तपत्रद्वारां वेळोवेळी प्रगट केले आहेत. त्यांच्या निरपेक्ष व प्रेमपूर्ण सूचनांचा मजकडून अगदीच अव्हेर झालेला नाही, असें पुस्तक वाचून पाहिल्यावर माझ्या टीकाकार मित्रांच्या निदर्शनास येईल. ग्रंथरचनेच्या कामी इतर सुहृद् मंडळीप्रमाणे टीकाकारांचेंही ग्रंथकारास अमोल सहाय्य होत असतें. तेव्हां इतर आप्तइष्टांच्या बरोबर टीकाकार मित्रांचेही प्रेमादरपूर्वक आभारकुसुमांनी पूजन करणें, हें ग्रंथकाराचे कर्तव्य आहे. आणि तद्‌नुरूप सर्व सहाय्यकारी स्‍नेही मंडळीबरोबर टीकाकारांचेही मी अत्यंत नम्रतापूर्वक आभार मानीत आहे.

'राक्षसी महत्त्वाकांक्षे'चा सर्वत्र आज जो थोडाबहुत बोलबाला आहे, त्याचें बहुतेक श्रेय श्रीयुत केशव विठ्ठल भोसले, मालक 'ललितकलादर्श नाटक मंडळी', यांचकडे व त्यांच्या मंडळीकडे आहे. त्यांनी व त्यांच्या नटवर्गाने अत्यंत श्रम करून 'राक्षसी महत्त्वाकांक्षे'चें अवजड धूड मोट्या नेटाने व धैर्यानें लोकांच्या दृष्टीसमोर आणून ठेवले नसतें, तर नाट्यकुशल कारागिरांनी आपल्या दैवी सामर्थ्यानें शृंगारले महाराष्ट्र-रंगभूमीच्या प्रेमललित दिव्य आनंदभुवनांचें द्वारही या आसुरी मायेच्या दृष्टीस पडलं नसतें. तेव्हां या धाडसी मंडळींचे विशेष आभार मानणे मला अवश्य वाटतें.

त्याचप्रमाणें पुस्तकरूपाने 'राक्षसी महत्वाकांक्षा' प्रसिद्ध करण्याचे शिरावर घेऊन सिद्धीस नेल्याबद्दल प्रकाशकांचाही मी फार आभारी आहे.

आतां शेवटी सर्वसहृदय रसिक वाचकवर्गाची पंतांच्या 'जरि बोबडें, पित्याचें मोहावें मन तथापि तोकानें;' या आर्यार्धानें प्रार्थना करून छोटेखानी प्रस्तावना लेख पुरा करतों.
(संपादित)

वामन गोपाळ जोशी
दि. १६ मे १९१४
'राक्षसी महत्त्वाकांक्षा' या नाटकाच्या पुस्तकाच्या चवथ्याच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- वामन गोपाळ जोशी (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.