A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भेटाल कां कोणी माझ्या

भेटाल कां कोणी माझ्या माणसांना माहेरीच्या ।
लेक सुखी आहे सांगा, सावलींत सासरीच्या ॥१॥

माझ्या माहेराची वाट नाहीं आडवळणाची ।
नाहीं कलहाचं ऊन, छाया मायेच्या वेलीची ॥२॥

तिथें नाहीं हेवा-दावा, नाहीं भांडणतंडण ।
सर्वांसाठीं आहे एक, एका मातीचं अंगण ॥३॥

दोघे भाऊ, भावजया, माझे बाबा आणि आई ।
एका ताटांतला घांस, पांचामुखीं गोड होई ॥४॥

चार जोडलेले तुकडे, पांघरूण हो बाळाचें ।
मनें मनें जुळुनी झालें, महावस्‍त्र माहेराचें ॥५॥

दूर राहिलें माहेर, दिसेनाशी झाली वाट ।
आम्हां वेडया बायकांची सासराशीं जन्मगांठ ॥६॥