A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चल उठ रे मुकुंदा

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन्‌ चोरपावलांनी आला पहाटवारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली

घे आवरून आता स्वप्‍नांतला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

तुज दूर हाक मारी कालिंदिचा किनारा
कुंजांतल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली
उषा - पहाट.
कुंज - वेलींचा मांडव.
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.
सुरेश भट यांची खूप गाणी माझ्याकडे आहेत. पण त्यापैकी फक्त दोनच गाणी मी रेकॉर्ड करू शकलो. त्यातलं एक गाणं तर खूप लोकप्रिय झालं. सुरेश भट हे एक अतिशय विद्वान कवी आहेत. त्यांच्या कल्पनेची भरारी असामान्य आहे. त्यांचं पहिलं गाणं रेकॉर्ड करण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य आहे.

चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

हे गीत जी.एन्‌.जोशी यांनी मला आणून दिलं व म्हणाले, "पुजारी, काय सुंदर काव्य आहे हे ! तुम्ही जरा या काव्याला चाल लावा म्हणजे मजा येईल."

खरं म्हणजे ही भूपाळीच आहे. पण भूपाळीबद्दल लोकांच्या मनात अनेक कल्पना होत्या. प्रथम माझी पण अशी कल्पना होती की, भूप रागामध्ये एखादं गाणं बांधलं की त्याला भूपाळी म्हणायचं. पण तसं नाहीये. कारण लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीत म्हणतो, त्याची अतिशय शांत अशी सुरावट असते. तसंच, देवाला जागवण्यासाठी- त्यांना पहाटेच्या साखरझोपेतून उठवण्यासाठी जे गायलं जातं ते- भूपाळी, ती पण नाजूक व आर्त स्वरातील विनवणी असावी. ढोल-ताशे वाजवून देवांना उठवायला देव काही कुंभकर्ण नाहीत. तर, हे गाणं सुद्धा भूपाळीच होती.

या गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्यावर सुरेश भट मला भेटले. त्यांनी माझ्या चालीचं खूप कौतुक केलं. ते ऐकून मला फार बरं वाटलं.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली

  इतर संदर्भ लेख

 

Print option will come back soon