A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चला पंढरीसी जाऊं

चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥

संता महंता होतील भेटी ।
आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥

तें तीर्थांचे माहेर ।
सर्व सुखाचें भांडार ॥४॥

जन्म नाही रे आणीक ।
तुका ह्मणे माझी भाक ॥५॥
भाक - शपथ.
भावार्थ-

  • चला आपण सगळ्यांनी पंढरपूरला जाऊ या. तेथे आपल्याला रुक्मिणीचा पती पांडुरंग पहायला मिळेल.
  • त्याच्या दर्शनाने डोळे तृप्त होतील. विठ्ठल नामाच्या गजराने, त्याच्या स्तुतीने कान संतुष्ट होतील.
  • तेथे गेल्यावर साधुसंतांच्या भेटी होतील. अतिशय आनंद होऊन वाळवंटात देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचू.
  • पंढरपूर हे सगळ्या तीर्थांचे माहेर आहे. सर्व सुखांचा तो एक भांडार आहे.
  • तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीला सर्व गोष्टींची तृप्ती होईल जन्ममरणाच्या फेर्‍यांतून सुटका होईल, हे मी शपथपूर्वक सांगतो.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.