A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चांद केवड्याच्या रात

चांद केवड्याच्या रातऽ आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा

तुझ्या गाण्यानं वेढलं शाहिरा
माझं जीवन आलंया मोहोरा

तुझ्या शब्दांचा होरा
जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहिरा
मन वादळवार्‍यात भोवरा

शुभ्र काचेत पारा
तसा संग चातुरा
हिर्व्या आषाढबनात डांगोरा
कसा पाण्यात लाविला अंगारा

जरा बांध गजरा
माझी आण शाहिरा
नव्या फुलून आलेल्या संसारा
माझ्या घराला सोन्याचा उंबरा
होरा - भविष्य, अंदाज.
'चांद केवड्याची रात' ही 'वही'ची कविता लतादीदिंनी त्याच्या सुरेल आवाजात गायली आहे. बाळासाहेबांनी ती छान संगीतबद्ध केली आहे.
(वही- हा खानदेशी लोकगीतप्रकार आहे. गझलच्या शेरोशायरीच्या पद्धतीने जाणार्‍या दोन 'सखी'च्या ओळी, मुखडा दोन ओळी आणि अगदीच वेगळा अंतरा अशी ती बांधणी आहे.)

नाटक, चित्रपट, संगीत, लोककला, तमाशा किंवा अशा क्षेत्रात एकत्र काम करणारी कलावंत मंडळी एकमेकांच्या प्रेमात पडतात हे खूप पूर्वीपासून आपण पाहतो, ऐकतो. ते प्रेमाने गुंतून जातात, विवाहबद्ध होतात. पूर्वीच्या त्याच्या गाण्याने त्याच्या प्रेमात पडलेली ती मनमुक्त गाते, नृत्य करते आणि शृंगार करताना त्याला गजरा बांधण्याची गळ घालते, असा भाव येथे आहे.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.