A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छंद तुझा मजला कां

छंद तुझा मजला । कां मुकुंदा लावियला ।
अशी कशी रे मी । भुललें सांग तुला ॥

संसारीं माझ्या । माझ्या ।
येउनिया कां ऐसा । ऐसा ।
केला घात पुरापुरा । पुरापुरा ।
कां असा रे घननीळा ॥

कशास झालें सासुरवाशीण मी रे ।
उठतां, बसतां, तुझेंच चिंतन ।
कुणा म्हणूं मम स्वामी । मम स्वामी ।
नकळे मी । जोंवरी तूं मनिं माझ्या ॥
१९४८ साली रंगभूमीवर आलेल्या 'एक होता म्हातारा' या नाटकाने पुन्हा प्रेक्षकांना 'नाट्य-निकेतन'च्या दिशेने आकर्षित केले. या नाटकाचे कथानक अत्यंत परिणामकारक तर होतेच, पण मामा पेंडसे आणि ज्योत्‍स्‍ना भोळे यांनी हे नाटक आपल्या अभिनयांनी एवढे उंच नेले की, 'एक होता म्हातारा' या नाटकाला 'नाट्य-निकेतन'च्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले, हे निर्विवाद होय.

मा. कृष्णराव यांनी या नाटकाला दिलेल्या गाण्याच्या चाली अनेक रसिकांच्या मते 'कुलवधू'च्या चालीपेक्षा कितीतरी उत्कृष्ट आहेत. त्यांतील 'ये झणी ये रे' व 'छंद तुझा मजला' ही गाणी लोकप्रिय झाली आहेत. तरीही विषण्ण वातावरणापेक्षा प्रफुल्लित वातावरणातील चाली जास्त लोकप्रिय होतात, हा अनुभव अनेक नाट्यनिर्मात्यांना आला असेल, तसा तो आम्हालाही या नाटकाच्या वेळी आला. या नाटकातील निष्कपट व प्रेमळ अशा तरुण म्हातार्‍याची भूमिका मामा पेंडसे हे तन्मयतेने करीत असत. पण दुर्दैवाने पहिल्या दोन प्रयोगांनंतर त्यांच्या पोटाचा विकार सुरू झाला, तो त्यांच्या पोटावर चार वेळा शस्त्रक्रिया करूनही मधूनमधून वर डोके काढीतच असे. स्वतः मामा पेंडसे या भूमिकेला आपल्या आजपर्यंतच्या सर्व भूमिकांमध्ये वरचे स्थान देतात.

ज्योत्‍स्‍ना भोळे यांच्या अनेक भूमिकांमध्ये ही भूमिका विशेष डोळ्यांत भरण्यासारखी होई. पहिल्या अंकात खेडवळ कुमारिकेची भूमिका केल्यानंतर लगेच दुसर्‍या अंकापासून घरंदाज पत्‍नीची पोक्त भूमिका करताना त्या नटीला आपला अभिनय पणाला लावावा लागतो. आणि तो ज्योत्‍स्‍ना भोळे यांनी लावला असल्यामुळे मामा पेंडसे आणि ज्योत्‍स्‍ना भोळे या दोघांचे प्रवेश पाहताना प्रेक्षकांना एक विशेष प्रकारचा आनंद लाभत असे.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' (लेखन सहकार्य जयवंत दळवी) या पुस्तकातून.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्‌, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.