A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छेडून गेले मधुर स्वर

छेडून गेले मधुर स्वर विमल
आज उपवनी कोण पाहिले
प्राणांचे ऋतुगंध उमलुनी
जीवन संगीत त्यास वाहिले

मदिर रात्र ही अधीर चंद्रिका
गात्रामधुनी हसे राधिका
डोळे टिपले पानांचेही
पहाट होता दहिवर ओले

कंठामधुनी सूर झुलावा
सुरांत तुझिया जीव फुलावा
मीलन होता मधुभावाचे
ह्या जन्माचे सार्थक झाले
उपवन - बाग, उद्यान.
चंद्रिका - चांदणे.
मदिर - धुंद करणारा.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
'कधीतरी कोठेतरी' हे संगीत नाटक मराठी रसिकांना आज सादर होत असले तरी त्याचे लेखन दोन अडीच वर्षांपूर्वी म्हणजे 'गोष्ट जन्मांतरीची' लिहिण्याच्या आधी घडलेलं आहे. नावावरूनच स्पष्ट व्हावे की हे एक कल्पनारम्य नाटक आहे. त्यातील शंखराजाच्या अद्भुत गूढतेचा स्पर्श मी एका पाश्चात्य नाटकातून (डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब यांचे दी मंकीज पॉ ) घेतलेला आहे. मात्र बाकीची कथावस्तू स्वतंत्र आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी माझे स्‍नेही आणि प्रख्यात गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांनी पाकिस्तानातील 'खानाबदोष' नावाच्या टोळीतील रेशमा नावाच्या एका गायिकेची चित्तथरारक गोष्ट सांगितली होती. इतकेच नव्हे तर तिच्या काही गीतांचा टेपही त्यांनी मला ऐकवला होता. धुंद करणार्‍या रेशमाच्या गळ्याचे आणि गायकीचे गुणदोषही त्यांनी त्याच वेळी मोठ्या रसाळपणे मला विशद करून सांगितले होते. त्याच वेळी 'कधीतरी कोठेतरी' नाटकाचा जन्म झाला. प्रत्यक्ष लेखन मात्र दोन अडीच वर्षांपूर्वी घडले.

'मत्स्यगंधा' नाटकाच्या वेळी संगीत नाटकाबद्दल लेखनाच्या दृष्टीने माझ्याकडून ज्या गफलती घडल्या होत्या, त्या या नाटकात टाळण्याचा मी प्रयत्‍न केला आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांना केवळ सवड मिळावी म्हणूनच नव्हे तर त्यांच्या तब्येतीने फुलत-उमलत या नाटकातले संगीत अवतरावे, या माझ्या आणि निर्मात्यांच्या आग्रहामुळेच हे नाटक उशीराने रंगमंचावर येत आहे.

या नाटकासाठी लेखनात पंडित जितेंद्र अभिषेकी, निर्माते मोहन तोंडवळकर यांचे अपरंपार साहाय्य झाले आहे. माझे तरुण स्‍नेही आणि उदयोन्मुख प्रतिभाशाली कवी श्री. किशोर पाठक यांनी तत्परतेने परिश्रमपूर्वक गीते करून दिल्याने या नाटकाच्या आकर्षकतेत भरच पडली आहे. श्री. अजित कडकडे, श्रीमती माधुरी पुरंदरे, श्री. नारायण बोडस यांच्यासारखे समर्थ गायक कलाकार आणि श्री. सखाराम भावे यांच्या सारखे मुरब्बी दिग्दर्शक लाभल्यामुळे या नाटकाच्या रंगतीमध्ये मोठीच भर पडणार आहे. कलावैभव या संस्थेचे इतर कलाकार आणि कार्यकर्ते यांनी या नाटकाच्या प्रयोगासाठी अपार मेहेनत घेतली आहे. या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे.
(संपादित)

वसंत कानेटकर
'कधीतरी कोठेतरी' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख