A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चिंब पावसानं रान झालं

चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी.

झाकू नको कमळनबाई एकान्‍ताच्या कोनी
रूपखनी अंगावरली सखे, लावण्याची खाणी.

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी.

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
आबादानी - भरभराट.
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
खनि - खाण.
झिम्मा - लहान मुलींचा एक खेळ.
सांदी - कोपरा / अंगण, परसु.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'शेलारखिंड' या कादंबरीवर रमेश देव यांनी चित्रपट करायचं ठरवलं. कादंबरीतल्या नायकाच्या नावाने.. 'सर्जा'. देवसाहेब गीतरचनेसाठी मागे लागले. वेळेचं गणित मला थोडंही जमणार नव्हतं.
रमेश देव मराठी, हिंदी चित्रपटातील ख्यातनाम कलावंत. सीमाताई यांचं चित्रपटातलं काम खूप पाहिलेलं. त्यांची धडपड व चिवटपणा यांनी मला घेरलं. मी तयार व्हायला आणखी एक कारण तो चित्रपट ऐतिहासिक होता हे नव्हे तर त्याचे दिग्‍दर्शक राजदत्त हे होतं. त्यांचा आग्रह. श्रेष्ठ असे दिग्‍दर्शक, अनेक चित्रपटांचे आणि टीव्ही मालिकांचे निर्माते सुद्धा. त्याचं मोठेपण व माणूसपण काही वेगळंच ! असा साधा, तत्त्वनिष्ठ सच्चा माणूस विरळा.

शेतावर खूप अडचणींचे प्रश्‍न होते ते सोडून, मन मोडून दोन-तीन वेळेला मुंबईत जावं लागलं. गीतांच्या जागा नक्की केल्या, आशय सांगितला की गीतं पाठवून द्यायची, हे मी कधीच केलं नाही. दिग्‍दर्शक-संगीतकार यांच्यासोबत चर्चा करून उत्तम होईल ते परिश्रमाने द्यावं, असं मी करतो. त्यामुळे काम कमी व हे दूरचे हेलपाटे अधिक ! नाइलाज म्हणून स्वीकारावे लागतात.

पळसखेडहून जळगावला. जळगाव ते मुंबई मिळेल त्या रेल्वेने, जागा नसली तरी, प्रवास. जागरण. मुंबईत कुठेतरी झोपण्यापुरती जागा शोधणं. दुपारी बारा वाजता टॅक्सीने 'प्रभुकुंज'ला येणं. तिथून पं. हृदयनाथ मंगेशकर यांना घेऊन पुन्हा दुसर्‍या टॅक्सीने बांद्रा (पूर्व) येथील 'मेघदूत' या रमेश देव यांच्या बंगल्यावर जाणं. रात्री बाराला 'प्रभुकुंज'वर त्यांना सोडून जिथं थांबलो तिथं अंग टाकणं. पुन्हा दुसर्‍या दिवशी तेच. शरीराची व मनाची प्रसन्‍नता थोडीही नाही.. आणि तरी छान गीतं दिली पाहिजेत.

पहिल्यांदा कादंबरीवर चर्चा करून चार गाणी करावी असं नक्की केलं. त्यातली एक- डोंबार्‍याचा खेळ करून तारेवरून चालत जाणारी डोंबार्‍याची मुलगी कस्तुरा. ती नायिका. तरुण डोंबारीण. इथे ढोल वाजला. त्याचा ठेका मला माहिती होता. नायक-नायिकेचा शृंगार, प्रेम. जंगलातल्या त्या झोपडीत वक्षस्थळापासून नायक-नायिकांचं उघडं शरीर दिसावं. भरदार तारुण्य, मोकळे केस, डोळ्यांत शरीर एकरूप.. दोघांची एकेका हातांची बोटं बोटांत घट्ट वेळून बोटांची चाळवाचाळव.. अशी उत्कट शरीरमीलनाची जागा गीतासाठी निर्माण केली होती. सिनेमावाल्यांच्या पैसे मिळवण्याच्या काही जागा असतात.
हे सर्व शब्दबंबाळ, बटबटीत, ओंगळ होऊ नये म्हणून मी काळजीत. आधी शब्दांची लय, बंदीश नक्की केली. निसर्गाच्या अनुभवाच्या, प्रतिमांच्या आधारे सूचक शब्दकळा.
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी

हे गीत अनेकांच्या तोंडी सर्वत्र आहे, याचा मला आनंद आहे.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख