A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवा मला रोज एक

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर!

कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर!

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये कुठे असतो असर!

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला?"
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर!

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय? पडे जगाचा विसर!
गीत- संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - संदीप खरे
अल्बम- नामंजूर
गीत प्रकार - कविता