A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धुंद एकान्‍त हा

धुंद एकान्‍त हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता तार झंकारली

जाण नाही मला, प्रीत आकारली
सहज तू छेडिता तार झंकारली

गंधवेडी कुणी लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीतली
यौवनाने तिला आज शृंगारली

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली

रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्‍न मी पाहिले
पाहतापाहता रात्र अंधारली

आज बाहूत या लाज आधारली
सहज तू छेडिता तार झंकारली
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या 'तुझ्या गळा माझ्या गळा' या गीतामध्ये भाऊ आणि बहिण यांच्यातील चिडवाचिडवीचा आणि गोड असा सुखसंवाद आहे. हे गीत जरी दोन व्यक्तींनी म्हटलेले असले तरी त्याला 'युगुलगीत' म्हणता येणार नाही, असे डॉ. आनंद यादव यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करताना आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मते हे एक प्रकारे एकाच कल्पनेला पूरक अशा समूहगीतांचे कार्य करते. या विधानाचा विचार केल्यानंतर तमाशातील सवालजबाबाला 'युगुलगीत' म्हणता येईल का? याचाही विचार होणे आवश्यक ठरते.

माधवराव ज्युलियन यांनी 'गज्जलांजली' मध्ये एकाच घटनेच्या वेगवेगळ्या बाजू मांडण्यासाठी जो प्रश्नोत्तरपद्धतीचा उपयोग केला आहे, तोही युगुलगीतसदृश आहे असे म्हणता येईल. यावरून असे दिसते की काव्यातील लयबद्धता, उत्कटता, रम्यता आणि स्वयंपूर्णता लाभलेल्या रचनांमध्ये स्त्री पुरुषांच्या नाट्यमय आविष्करणाला 'युगुलगीत' म्हणता येईल.

तंजावरकालीन मराठी नाटकांमध्ये जो संवादगीत या नामाभिधानाने प्रकार रूढ होता, तो पुढे आपल्याकडे 'द्वंद्वगीत' या नावाने लोकप्रिय झाला. 'द्वंद्व' शब्द उच्चारल्यावर आपल्या समोर 'भांडण' उभे रहाते, म्हणून की काय, जोडीचे गीत अशा अर्थाने 'युगुलगीत' हा शब्दप्रयोग पुढे आला आणि आता तो सर्रास रूढ झाला आहे. मी चार दशकांपूर्वी (१९५० मध्ये) लिहिलेल्या आणि कालांतराने लता मंगेशकर आणि अरुण दाते यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या 'संधीकाली या अशा' या युगुलगीतामध्ये सर्व प्रथम युगुलगीत हा शब्द गीतातील संहितेमध्ये उपयोजिला आहे, हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

मराठी भाषेमध्ये विपुल युगुलगीते लिहिली गेलेली नाहीत. चित्रपटाच्या निमित्ताने सुरुवातीच्या काळात स. अ. शुक्ल, राजा बढे, ग. दि. माडगूळकर, बाबुराव गोखले यांनी आवर्जून मराठी युगुलगीते लिहिली तर नाटककार मो. गो. रांगणेकरांनीही 'भाग्यवती मी त्रिभुवनी झाले', 'तुझं नि माझं जमेना' सारखी युगुलगीते लिहून लोकप्रिय केली आहेत. श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, दत्ता डावजेकर, दशरथ पुजारी अनिल-अरुण आदि संगीतकारांनी या गीतप्रकाराकडे एक वैशिष्ट्यप्रधान गीतप्रकार म्हणून पाहिल्यामुळे गैरफिल्मी गीते असूनही मराठी युगुलगीते लोकप्रिय झालेली आहेत. मराठी चित्रपटालाही मा. कृष्णराव, सुधीर फडके, केशवराव भोळे, डी. पी. कोरगावकर, राम कदम, वसंत प्रभू इत्यादी संगीतकारांनी संगीत देऊन रसिकासमोर युगुलगीते आणली आहेत.
(संपादित)

गंगाधर महाम्बरे
'मराठी युगुलगीते' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.