A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ध्वज अशरण हा

ध्वज अशरण हा
ध्वज अमरण हा
ध्वज अविरत हा फडकेल !

वीरांच्या रुधिरांत भिजे हा
संतांच्या श्रद्धेंत रुजे हा
त्रिवर्ण हा निर्भय नीलांतुन
जीवन नव बरसेल !
ध्वज अविरत हा फडकेल !

दुर्बल-दलितांचें हा रक्षण
मिरविल समतेचें राणेंपण
अमानवांचें अंध महाबल
यावरती तडकेल
ध्वज अविरत हा फडकेल !

नक्षत्रांच्या दिव्य पथांतुन
इंद्रधनुष्यांच्या वेशीतुन
निळे चक्र हे जाईल, तेथे
जगत नवे उमलेल
ध्वज अविरत हा फडकेल !
गीत - कुसुमाग्रज
संगीत - यशवंत देव
स्वर- गोविंद पोवळे, सीमा चंद्रगुप्‍त
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४७.
रुधिर - रक्त.
राणेपण - राजपद.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  गोविंद पोवळे, सीमा चंद्रगुप्‍त