A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ध्वज तेजाळुनी स्वातंत्र्याचा

ध्वज तेजाळुनी स्वातंत्र्याचा
सूर्य सांगतो त्रैलोक्याला
युगनिर्माता महाराष्ट्राचा
आज शिवाजी राजा झाला
राजा झाला

महान पहिला छत्रपती
राजदंड तो घेता हाती
घरोघरी ती समता-प्रीती
धर्मक्षेत्री वास्तुशांती
देवही आला देऊळाला
आज शिवाजी राजा झाला
राजा झाला

निर्भयतेची किरिट-कुंडले
लेऊन जनता वचनी बोले
वंद्य जयाच्या चरणी चाले
चौदा रत्‍ने उधळित आले
त्रिभुवन अवघे दरबाराला
आज शिवाजी राजा झाला
राजा झाला

शिवरायाचे रूप पहावे
शिवरायाचे चरित्र गावे
शिवकार्याचे सेवक व्हावे
मुजरा पहिला छत्रपतीला
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
किरीट - मुकुट.
(दीनानाथ मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूर येथे. लता मंगेशकर यांचे वय बार-तेरा वर्षे.)
दीदी मुख्य हिरॉइनच्या भूमिकांसाठी वयानं अजून लहानच होती. काम मिळत होते ते बालअभिनेत्री म्हणूनच. भूमिकेच्या वाट्याला जेवढी गाणी असतील तेवढीच. अभिनय करणं हे तर तिला कधीच पसंत नव्हतं, आजही नाही. तिला ते खोटं वाटतं. अभिनयासाठी कराव्या लागणार्‍या तडजोडी तर वैयक्तिक स्वातंत्र्यावरच आघात करतात.

(मा. विनायक यांच्या मृत्यूनंतर. लता मंगेशकर यांचे वय अठरा-एकोणीस वर्षे.)
आतापर्यंत जागेचं भाडं विनायकराव भरत होते. पण आता जागेच्या मालकानं आमच्यामागे 'भाडं द्या नाही तर जागा खाली करा' असा तगादा लावला. काय करावं काहीच सुचत नव्हतं.
अशातच दीदीनं अतिशय ठामपणे एक निर्णय घेतला. एके दिवशी तिनं आम्हां सर्वांसमोर तो बोलूनही दाखवला. "मी कुठेही आणि कसलंही काम करेन, पण यापुढे तोंडाला रंग लावणार नाही. दिग्दर्शक म्हणेल तेव्हा रडायचं, तो म्हणेल तसं हसायचं हे मला जमणार नाही. मला अभिनय करायला आवडत नाही. मी ते काम करणार नाही. आता जे नशिबात असेल ते होईल."

(बराच काळ लोटल्यावर..)
भालजी पेंढारकरांचा आणि आमचा जुना स्‍नेह. भालजींना आम्ही बाबा म्हणत असू. छत्रपती शिवाजीमहाराजांवरची भक्ती हा आमच्यातला समान धागा. बाबा प्रखर हिंदुत्ववादी होते. शिस्तप्रिय होते. मनानं अतिशय कणखर होते. तत्त्वाचे आणि सत्त्वाचे पक्के होते. त्यांच्या-आमच्या आचारविचारांमध्येही अगदीच साम्य होतं. नवभारताच्या बांधणीच्या ध्यासानं झपाटलेले बाबा. चित्रपटनिर्मिती हा बाबांसाठी केवळ व्यवसाय नव्हता, तर समाजसुधारणेचं साधन होतं. या माध्यमाचं पावित्र्य त्यांनी आयुष्य पणाला लावून जपलं होतं. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओच्या वातावरणात आणि व्यक्तिगत व्यवहारातही त्याची प्रतिबिंबं उमटलेली दिसत. बाबांच्या चित्रपटांचे विषयही ऐतिहासिक किंवा सामाजिक असत.

बाबांनी एकोणीसशे बावन्‍न साली 'छत्रपती शिवाजी' नावाच्या महत्त्वाकांक्षी सिनेमाची निर्मिती केली होती. त्यासाठी सी. रामचंद्रांच्या संगीत दिग्दर्शनात दीदीनं काही गाणी गायली होती. 'आयुष्यात कधीही तोंडाला रंग लावणार नाही' अशी प्रतिज्ञा केलेल्या दीदीनं या चित्रपटात लहानशी पाहुणी भूमिकाही केली होती. छत्रपती शिवाजीमहाराजांवरची श्रद्धा आणि बाबांचा आग्रह तिला डावलता आला नाही. चित्रपटाच्या शेवटी शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगी हातांत आरतीचं ताट घेऊन 'आज शिवाजी राजा झाला' हे गाणं गाताना ती पडद्यावर दिसते.
(संपादित)

मीना मंगेशकर-खडीकर
'मोठी तिची सावली' या पुस्तकातून.
शब्दांकन- प्रवीण जोशी
सौजन्य- परचुरे प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.