तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल
अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पाणी?
राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ
ढगावानी बरसंल त्यो, वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जिवाचा त्यो आरसा असंल
उडुनिया जाईल ही आसवांची रात
आपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले, सुरेश वाडकर |
चित्रपट | - | शापित |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
खरं म्हणजे गाण्याचे शब्द प्रचंड आशावादी.. पण एक तर चित्रपटाचे नाव 'शापित' व एकूणच त्या नायक-नायिकेची होणारी परवड.. त्यामुळे जेंव्हाजेंव्हा या गाण्याचा विषय निघे, आजूबाजूचे कोणीतरी हमखास बोलून जात, "पण या गाण्यानंतर त्यांचे फार हाल होतात ना?"
सर म्हणाले.. "चांगलं चित्रपटगीत ओळखण्याची अगदी सोपी व्याख्या सांगू का? चित्रपटात असताना ते त्या कथेमध्ये पूर्णपणे विरघळून जायला हवं.. पण चित्रपटाच्या बाहेर ते मूळ कथेच्या सीमा ओलांडून तुझ्या-माझ्या आयुष्यात शिरायला हवं. बर्याच जणांना या गाण्यापेक्षाही चित्रपटातील नायक-नायिकेवर होणारा अन्याय जास्त लक्षात राहतो.. त्याला पर्याय नाही. पण अगदी 'शापित' न पाहिलेल्या अनेकांना हे गाणं त्यांच्या मनातील आशेच्या अंकुराशी, अपराजित आशावादाशी नाळ जोडणारं वाटतं. शेवटी कुणी काय बघायचं.. काय घ्यायचं.. ते ज्याने त्याने ठरवावं !"
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.