A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दोन धृवावर दोघे आपण

दोन धृवावर दोघे आपण तू तिकडे अन्‌ मी इकडे
वार्‍यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहीकडे

दिवस मनाला वैरि भासतो
तारा मोजित रात गुजरतो
युगसम वाटे घडी घडी ही कालगती का बंद पडे?

निश्वसिते तव सांगायाला
पश्चिमवारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा सर्वांगी जणुं स्पर्श घडे

स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते
एक पाखरूं तुझ्याच भंवते
मुक्या मनाचे दु:ख सागरा सांग गर्जूनी तूं तिकडे

तोच असे मी घरही तेही
तोच सखी संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा, प्राण तिथे अन्‌ देह इथे
गीत - मा. ग. पातकर
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
'दोन धृवांवर दोघे आपण, तू तिकडे अन् मी इकडे' हे गाजलेलं भावगीत आहे १९५२ सालचं. गीतकार माधव पातकर यांनी लिहिलेलं आणि संगीतकार गजानन वाटवे यांनी स्वतः संगीत दिलेलं आणि गायलेलं हे भावपूर्ण गीत आहे.

गजानन वाटवे हे मराठी सुगम संगीतातलं आद्य नाव ! तशी मराठी सुगम संगीताची गंगोत्री म्हणजे जे. एल. रानडे, तर जी. एन. जोशी आणि गजानन वाटवे हे त्यानंतरचे लगेच येणारे टप्पे आहेत. जे. एल. रानडे यांची शास्त्रीय बंदीश शैलीची सुगम संगीत रचनांची ढब आणि जी. एन. जोशींची बहुतांशी अवघड गायकी असलेली शैली यानंतर रसिकांनी अधिक पसंत केली ती गजानन वाटव्यांची साधी आणि सोपी गायन शैली. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गाण्यातल्या शब्दांना सर्वाधिक महत्त्व देऊन त्यानुसार त्याची संगीतरचना आणि गायन करण्याचं तत्त्व गजानन वाटव्यांनी रसिकांना आपल्या संगीतरचनांच्या आणि गायनाच्या मार्फत सांगितलं. ते स्वतःला काव्यगायकच म्हणायचे एवढं शब्दांचं महत्त्व त्यांच्या लेखी होतं. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांच्या मालिकेतलं 'दोन धृवांवर दोघे आपण, तू तिकडे अन् मी इकडे' हे एक सुंदर गीत आहे आणि त्याची ही एक छोटीशी कहाणी आहे जी अण्णांनी म्हणजे गजानन वाटव्यांनी 'गगनी उगवला सायंतारा' या त्यांच्या आत्मचरित्रात सांगितली आहे.

अण्णांच्या पत्‍नी डॉ. सुषमा वाटवे उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जाणार होत्या. त्यांच्यासाठीचे निरोप समारंभ जायच्या आधी २–३ दिवस मुंबईत चालू होते, सगळ्यांकडून विविध भेटवस्तू येत होत्या आणि अखेर जायचा दिवस उजाडला. बोटीचा प्रवास होता आणि निरोप द्यायला अर्थातच अण्णा बोटीवर गेले होते. विवाह होऊन २ -३ वर्षच झाली असल्याने जवळजवळ एका वर्षाचा विरह हा दोघांनाही जड जाणार होता. बोट सुटायच्या वेळेला उभयतांनी अखेरचा निरोप घेतला आणि मन घट्ट करुन उदास झालेले अण्णा बोटीच्या खाली उतरले. त्याच दिवशी संध्याकाळी झेवियर महाविद्यालयातल्या एका कार्यक्रमात अण्णांना गायचे होते. अण्णा गायला बसले. खिशात कवी माधव पातकरांनी पाठवलेला कवितेचा कागद होता आणि कवितेचे शब्द होते, 'दोन धृवांवर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे'.

विरहवेदना प्रकट करणारे पातकरांचे अतिशय उत्कट शब्द आणि नुकताच पत्‍नीला दिलेला भावपूर्ण निरोप यामुळे अण्णा उत्स्फूर्तपणे जशी चाल सुचेल तसं गात गेले. कार्यक्रम ऐकायला एच.एम.व्ही. या रेकॉर्ड कंपनीचे अधिकारी रेळे आणि कामेरकर आले होते. या नवीन गाण्याने भारले गेलेल्या त्यांनी अण्णांना लगेच त्याची ध्वनिमुद्रिका करण्यासाठी बोलावलं. अण्णांना गाण्याची थोडी अजून सजावट करायची होती, वाद्यवृंदाची रचनाही करायची होती. परंतु एच.एम.व्ही.च्या सगळ्यांना केवळ अण्णा आणि त्यांचा आवाज हवा होता, इतका विश्वास त्यांचा अण्णांवर, अण्णांच्या आवाजावर होता. नैसर्गिकरीत्या निकोप, गोल आणि भावनेने भिजलेला अण्णांचा आवाज आणि त्यांचीच स्वररचना असं जमलेलं रसायन होतं. ध्वनिमुद्रण झटक्यात आणि यशस्वीपणे पार पडलं आणि तेच गीत आजही आपण ऐकून धन्य होतो.

हे गाणं पूर्णपणे अण्णांनी व्यापलेलं आहे. दोन कडव्यांमध्ये जो वाद्यवृंद वाजलाय तो म्हणजे गाण्याच्या धृवपदाचीच सुरावट आहे. त्यांच्या संगीत रचना करायच्या नेहेमीच्या शैलीनुसार चारही कडव्यांना वेगवेगळ्या चाली आहेत; शास्त्रीय संगीताचा रियाज करताना जसा गायक एकच राग पण दररोज वेगवेगळ्या उपजेने, विस्ताराने गातो अगदी त्याप्रमाणे. प्रतिभावान, जातिवंत आणि मनस्वी कलाकाराचं हे लक्षण असतं. असा कलाकार आपल्या धुंदीत असतो आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या कलेची साधना, सादरीकरण करत असतो. त्याची कला कोणाला प्रभावित करण्यासाठी, खूष करण्यासाठी नसते आणि म्हणूनच तिचं शुद्ध, निर्मळ स्वरूप तो सादर करू शकतो. अण्णा असेच होते. २४ तास केवळ डोक्यात गाणच असायचं. चांगली कविता पुढे आली की लगेच चाल गाऊ लागायचे. पेटीवर बोटं यांत्रिकपणे फिरायला लागायची आणि स्वरांवर हुकुमत असल्याने दोन कडव्यातलं मुझिकही त्याच ओघात वाजवायचे. कुठल्याही स्वराचा, व्यंजनाचा, जोडाक्षराचा त्यांचा उच्चार सहज आणि निर्दोष होत असे. नैसर्गिकरीत्या स्पष्ट उच्चार आणि मोकळा आकार या त्यांच्या गोष्टी सुगम संगीत गायकाने अभ्यास कराव्या अशा होत्या.

तंत्राच्या बाबतीत आजचं सुगम संगीत खूप प्रगत झालय. या प्रगतीला सकस शब्दकळा आणि ती समजून त्यानुसार झालेली संगीतरचना आणि कवीचे शब्द आणि संगीतकाराची चाल समर्थपणे आणि भावपूर्ण पद्धतीने रसिकांना ऐकवण्याची गायकाची जोड मिळाली तर तो आनंद अवर्णनीय असेल !

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.