A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दोन घडीचा डाव

दोन घडीचा डाव
त्याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
रंक आणखी राव

माळ यशाची हासत घालू
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव

मनासारखा मिळे सवंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दुःखाला नच वाव
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- मंजू, अनंत मराठे
चित्रपट - रामशास्‍त्री
राग - मिश्र काफी
गीत प्रकार - चित्रगीत
रामशास्त्री लहानपणी कसा उनाड होता, त्याचे विद्याभ्यासाकडे कसे लक्ष नव्हते येथपासून 'रामशास्त्री' या चित्रपटाचे कथानक सुरू होते. त्याकाळच्या रीतीप्रमाणे लवकर लग्‍न झाले होते पण बायको म्हणजे काय, एक खेळगडीच ! घरी खेळ, बाहेरही खेळ- म्हणजे मुलांशी. मुलांचे खेळ थोडेसे राकट. ब्राह्मणाची विद्या? त्याचा गंध सुद्धा नाही. पित्याच्या मृत्यूमुळे विद्येविषयीचा आग्रह कोण धरणार? अशा अवस्थेत जीवनसुद्धा 'दोन घडीचा डाव' वाटल्यास नवल ते कोणते?

सकाळची वेळ. चिमुरड्या परकरी सुनेला - जानकीला - भूक लागलेली असते. सासूबाई स्वयंपाक करीत असतात. सून 'भूक भूक' करीत असते. सासू सांगते, "जरा थांब. राम येऊ दे. म्हणजे दोघांना वाढेन." सून सागरगोटे घेऊन बाहेरच्या ओसरीवर डाव मांडते. सागरगोटे पसरते. एक-दोन झेलते. पण विशेष लक्ष लागत नाही. एकटीच काय खेळणार? म्हणून शेवटी गाणे म्हणू लागते. "दोन घडीचा डाव । त्याला जीवन ऐसें नांव ॥" गाण्यात ती रंगते तोच राम नकळत येतो आणि मग आपला सूर मिळवून म्हणतो, "मनासारखा मिळे सवंगडी । खेळाला मग अवीट गोडी । दुःखाला नच वाव ॥"असे हे दोघांचे गाणे.
उगीच ओढून-ताणून आणलेले, गाणे असावेच म्हणून एक घातलेले, एवढेच !

मंजू आणि अनंत मराठे दोघेही चांगली गाणारी. चाल साधी सोपी. मुलांना सहज जमेल व साजेल अशी, मिश्र काफीमध्ये. गाण्याला स्वराची अडचण पडली नाही. कारण दोघांही गाणार्‍यांची पट्टी एकच. साथीमध्ये सतार या भारतीय वाद्याला विशेष पुढाकार दिला. तबला या गाण्यामध्ये अब्दुल करीम या वादकाने इतका ढंगदार वाजविला आहे की, "कोण हा उस्ताद?" म्हणून त्याची चौकशी झाली. त्याला आम्ही तमाशाच्या थिएटरमधून हुडकून आणला. त्याचा चेहरामोहरा, वेष असा होता की कोणालाही वाटू नये हा इसम इतका गुणी आहे. पण वाजवायला बसला की चेहरा आणि वाणी जे बोलणार नाही ते त्याच्या दोन्ही हातांची बोटे बोलतील. जसे गाणे तसे त्याचे वाजविणे. पण त्या त्या वेळी काय ठरविले आहे ते खुणेने त्याला सांगावे लागे मग ठरवलेले बोल वाजायचे. त्याच्या तबल्याला खास माईक देऊन जेव्हा गाणे रेकॉर्ड केले तेव्हा तर विशेष खुशीत येऊन त्याने वाजविले. गाण्याबरोबर तबलाही खूप बोलला आहे. हिंदी आवृत्तीत हिंदी ढंगाचे गाणे घातले आहे. त्यातही त्याने खेमटा आणि दादरा यात आपल्या चतुरस्त्र वादनाचे कौशल्य दाखवले आहे. डग्‍गा घुमविण्याचे त्याचे कसब अगदी हुबेहुब अल्लारखा या विख्यात तब्बलजीसारखे. डाव्या हाताच्या घिस्स्याने त्याने गाण्याच्या ओळींमधून घातलेले वाद्यसंगीत असे काही पुढे सरकवले आहे, असे काही खुलवित नेले आहे की पुढील ओळींत ते सहज विलिन व्हावे. त्याचे चतुरस्त्र वादन ऐकून ऐकूनच मला त्यातले अनुरूप बोल, लग्‍ग्या निवडून त्या शोभतील त्या जागी घालाव्या लागल्या. ते बोल, त्या लग्ग्या मी लिहून घेत असे. सुरुवातीचे काही बोल सांगितले की त्याच्या हातून ते बोल उमटलेच म्हणून समजावे. अनेक तालमींमुळे त्याच्या डोक्यात हे ठरवलेले अनुरूप बोल ठसले होते. पुन्हा ध्वनीमुद्रण करताना ठराविक म्हणजे चाचणीत दिल्याप्रमाणे वाजवण्याचे शिक्षणही त्याला रोज देत गेलो. दोनतीन महिन्यांत तो या हिशेबात पक्का झाला. पुढे मुंबईला गेल्यावर तो तिथल्या संगीत दिग्दर्शकांना अनुभवाचे खडे बोल सुनावू लागला.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.