A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक होता काऊ तो

एक होता काऊ,
तो चिमणीला म्हणाला,
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ !"

एक होता पोपट,
तो चिमणीला म्हणाला,
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट !"

एक होती घूस,
ती चिमणीला म्हणाली,
"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस !"

एक होती गाय,
तिने चिमणीला विचारले,
"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय?"

एक होते कासव,
ते चिमणीला म्हणाले,
"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव !"
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- शमा खळे
गीत प्रकार - बालगीत
एकदा खरंच असं झालं. दूरदर्शनवर मुलांच्या एका कार्यक्रमात मी भाग घेतला होता, वेगवेगळ्या शाळांतली, पण एकाच इयत्तेतली मुलं या कार्यक्रमासाठी जमली होती. त्यांच्या पाठ्यपुस्तकात माझी एक कविता होती. या कवितेवर मुलांनी प्रश्न विचारायचे आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असा या कार्यक्रमाचा बेत होता. मी दिलेली उत्तरं परीक्षेसाठी उपयोगी पडतील, म्हणून अनेक मुलं हा कार्यक्रम ऐकत असणार !

कार्यक्रम सुरू झाला. मुलं प्रश्न विचारू लागली. परीक्षेत जसे येऊ शकतील तसे प्रश्न. त्या प्रश्नांवरून अगदी स्पष्ट दिसत होतं की, हे प्रश्न मुलं विचारीत असली तरी, परीक्षा घेऊ शकणार्‍या मोठ्या माणसांनी हे प्रश्न त्यांना लिहून दिलेले आहेत ! एक गोष्ट मला दिलासा देणारी होती आणि ती म्हणजे या प्रश्नांची उत्तरं परीक्षेत मला स्वतःला लिहायची नव्हती ! त्यामुळे मी अगदी बिनधास्त होतो आणि मुलांनी विचारलेल्या त्या प्रश्नांना भलत्याच आत्मविश्वासाने उत्तरं देत होतो ! माझ्या त्या कवितेत कठीण शब्द एकही नव्हता ! पण कवितेचा 'अभ्यास' करायचा म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ समजून घ्यायला नकोत काय ! तेव्हा एकदोन मुलांनी काही शब्दांचे अर्थही मला कठीण शब्दांचे अर्थ म्हणून गंभीरपणे विचारले; आणि मीही विचारात पडलो आहे असं दाखवीत, तितक्याच गंभीरपणे, त्या शब्दांचे अर्थ सांगितले ! आता ही मुलं कवितेतल्या शब्दांचं व्याकरण मला विचारतील की काय, अशी भीती क्षणभर मला वाटली ! पण सुदैवाने, ते प्रश्न लिहून देणारे शिक्षक दयाळू असल्यामुळे, हा बिकट प्रसंग माझ्यावर ओढवला नाही !

प्रश्न विचारून संपले; पण कार्यक्रमाची वेळ अजून संपली नव्हती, काही मिनिटं शिल्लक होती ! तेव्हा त्या कार्यक्रमाचे निर्माते मला म्हणाले, "पाडगांवकर, प्रश्न विचारून संपले आहेत; तेव्हा, मुलांना एखादी नवी कविता म्हणून दाखवा ना !" म्हणून दाखवण्यासाठी मी माझ्या कविता बरोबर घेऊन गेलो नव्हतो; त्यामुळे, मी ही विनंती ऐकताच क्षणभर गडबडलो ! पण आता विचार करायला वेळच नव्हता; एखादी कविता म्हणण्यापुरती वेळ शिल्लक होती ! माझी एक कविता मला आठवेल, असं मला खात्रीने वाटलं, म्हणून, ती कविता म्हणायला मी सुरुवात केली. शब्दांशी आनंदाने खेळणं किंवा शब्दांशी खेळताना आनंद मिळवणं ही कविता लिहिण्यामागची प्रेरणा होती. कवितेत यमकं जुळलेली होती. मुलं गोट्या घेऊन त्या मजेत खुळखुळवतात. तसं त्यांनी यमकांच्या जोड्या जुळवीत ओळींच्या ठेक्यात खेळावं; खेळताना त्यांचा उनाडपणा, मिस्कीलपणा प्रकट व्हावा. थोडक्यात सांगायचं म्हणजे, गंमत ! गंमत हीच त्या कवितेची भूमिका की काय म्हणतात ती होती ! हे दे, ते दे, असं कर, तसं कर म्हणून मुलं आईला भंडावतात, तसं, या कवितेत पशुपक्षी त्या बिचार्‍या चिमणीला भंडावतात !

मी कविता म्हणू लागलो,
एक होता काऊ,
तो चिमणीला म्हणाला,
"तू घाल मला न्हाऊ !"

एक होता पोपट,
तो चिमणीला म्हणाला,
"तू मला थोप !"

एक होती घूस,
ती चिमणीला म्हणाली,
"तू माझे अंग पूस !"

एक होती गाय,
तिने चिमणीला विचारले,
"तुझे नाव काय?"

एक होते कासव,
ते चिमणीला म्हणाले,
"मला चड्डी नेसव !"

शेवटचं कडवं म्हणून संपलं तेव्हा सगळी मुलं मोठ्याने हसली. ती अगदी खूष दिसत होती ! परीक्षेत प्रश्न येतील म्हणून जिचा 'अभ्यास' करायला नको अशी ही कविता त्यांना अगदी अचानक भेटली होती ! मी घरी आलो. दिवाणखान्यात जरा विसावलो होतो, इतक्यात फोन वाजला. माझ्या एका स्‍नेह्यांचा फोन होता. ते मला म्हणाले, "पाडगांवकर, तुमचा टीव्हीवर नुकताच झालेला कार्यक्रम आमच्या शेजारी राहणार्‍या एका आठ वर्षांच्या मुलाने ऐकला. त्याला तुम्ही शेवटी म्हटलेली कविता इतकी आवडली की, त्याने स्फूर्ती येऊन दोन ओळी रचल्या. त्याचे आईवडील त्या मुलाला घेऊन इकडे आले आहेत. तुम्ही त्यांच्या मुलाशी फोनवर बोलावं अशी त्यांची इच्छा आहे."

माझी कविता ऐकून एका मुलाला कविता हा खेळ शब्दांशी खेळावा, असं वाटलं; आणि त्याने आयुष्यात प्रथमच दोन ओळी रचल्या हे ऐकून मला फार बरं वाटलं. मी त्या मुलाशी फोनवर बोलायला अगदी उत्सुक झालो. तो मुलगा फोनवर आला आणि म्हणाला,
"पाडगांवकरकाका, तुमची कविता मला फारच आवडली!"
मी म्हणालो, "कुठली रे?"
तो म्हणाला, "एक होतं कासव, ते म्हणालं मला चड्डी नेसव!"
मी म्हणालो, "अरे, तूसुद्धा दोन ओळी केल्यास असं मला कळलं. मला त्या म्हणून दाखव की !"
तो म्हणाला,
एक होता बैल,
तो चिमणीला म्हणाला,
"माझी चड्डी झाली सैल !"

त्याच्या त्या ओळी ऐकून मी इतका प्रचंड हसलो की, घरातली माणसं माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली !!

गोष्ट जशी घडली तशी मी सांगितली ! गोष्ट इसापाची नसली तरी, छोटंसं तात्पर्य सांगावं असं वाटतं. खरं तर, ते सांगण्यासाठीच इतकी प्रस्तावना केली ! तात्पर्य हेच की, 'आता खेळा नाचा' या संग्रहातल्या या कवितांशी मुलांना खेळू द्या ! असं आनंदाने खेळता खेळता, त्यांना ठेका धरीत शब्द जुळवू द्या ! आनंदाचा ठेका धरीत ज्यांना शब्द जुळवता येतात त्यांना कविता म्हणजे काय हे व्याख्यान देऊन सांगावं लागत नाही. ते कवितेचे असतात, कविता त्यांची असते.
(संपादित)

मंगेश पाडगांवकर
'आता खेळा नाचा' या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मौज प्रकाशन गृह, मुंबई

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.