A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गणपतीबाप्पा मोरया (२)

गणपतीबाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लौकर या !

इवले इवले डोळे, तुमचे मोठे मोठे कान
येवढे थोरले डोके, कसे पेलते तरी मान?
गोरागोरापान रंग, मऊ नितळ छान अंग
मोठ्या तुमच्या पोटामध्ये मोठी माया !

मोठ्या थोरल्या पोटावरी वाकडी वळे सोंड
सोंडेखाली लपुन बसे देवा, तुमचे तोंड
दोनांवरी दोन हात, एकच कसा तुमचा दात?
अजब वाटे रूप असे बघावया !

उंदरावरी बसुन कशी डुलत येते स्वारी
गोड गोड मोदकांची आवड तुम्हां भारी
शोभिवंत मखर, त्यात पूजेचाही थाटमाट
आरतीला टाळ-झांजा वाजवाया

पाहुणे तुम्ही येता घरी, मौज होई मोठी
खिरापत खाऊ मिळे, मिळे आम्हा सुट्टी !
पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या-ज्ञान आम्हा द्यावे
मनोभावे वंदु तुम्हां, गणराया !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.