A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाण्यात सर्व माझ्या

गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे

झाडांत पावसाच्या बेहोष आरतीला
वाजे मृदंग तेथे माझाच प्राण आहे

का वेदनेत होतो हा जन्म या सुरांचा?
रेषाच संचिताची ही बेगुमान आहे

आयुष्य पेटताना ओठांत सूर होता
हे सोसणे सुराला माझ्या प्रमाण आहे
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत -
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
गीत प्रकार - कविता
गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे..

मी अनेक गाणी लिहिली पण मला असं वाटतं की आजच्या या लिखाणाच्या निमित्ताने माझ्या गाण्यांची, कवितांची, निर्मितीप्रक्रिया आणि कवितेचा प्रवास आपल्यासमोर उलगडावा. गाणं लिहिणं हा सर्जनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे, असं मला वाटतं. काव्याचे वेगवेगळे प्रकार मी हाताळले आहेत आणि हे वेगवेगळे प्रकार हाताळावे असं मला वाटतं, कारण जे जीवन आपण जगतो त्या जीवनाचं स्वरूप. प्रत्येक माणूस आयुष्यात नानाविध अनुभव घेत असतो. या प्रत्येक अनुभवाला स्वत:चं रूप असतं, स्वत:चा चेहरा, स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं. केळीच्या सालीवरून पाय घसरून रस्त्यावर दाणकन कोसळण्याचा अनुभव वेगळा असतो आणि एखादं सुंदर फूल पाहिल्यावर मनात जे कोवळेपणानं उमलतं, ते त्या रूपापेक्षा संपूर्णपणे वेगळं असतं. ही दोन्ही रूपं जर कवी म्हणून मला शोधायची असतील तर माझ्या अभिव्यक्तीची शैलीची चौकट मोडणं मला भाग आहे. माझ्या 'जिप्सी या कवितेतही हा उल्लेख मी केलेला आहे. प्रत्येक अनुभवाचा शोध 'आपणच निर्मिलेले आपणच मोडू धजे' अशा वृत्तीने मला घ्यावासा वाटतो.

जीवनातले काही अनुभव आपलं रूप, आपला चेहरा जेव्हा एक कवी म्हणून माझ्याकडे मागू लागतात तेव्हा त्या अनुभवाचं मला गाणं करावंसं वाटतं. तशी एखादी ओळ चटकन माझ्या मनात येते. आधी ठरवून कवितेच्या लेखनाला सुरुवात होत नाही. एखादं पाखरू येऊन अकस्मात फांदीवर बसावं तशी ती ओळ येऊन माझ्या मनात बसते. छंद कळल्यानंतर ती ओळ माझ्याशी, माझ्या जाणिवेशी संवाद साधू लागते आणि अचानक माझं मन म्हणू लागतं की या ओळीचं एक गाणं होणार आहे. कधी कधी दुसरी एखादी ओळ येते तीही छंदातच असते. पण मी तिचं गाणं करतोच असं नाही. माझ्या काव्यनिर्मितीच्या तळाशी आत्मशोध आहे, असं मी मानतो. मानवी जीवन हे अत्यंत गतिमान आणि प्रवाही असतं. त्या अनुषंगाने येणारे बांध हे सोयीसाठी आणि सवयीनेही निर्माण केले जातात, हे अगदी खरं. पण बांध फोडून पुढे जाणं ही तर प्रवाहाची खरी शक्ती असते. जो वाहण्याचा थांबला तो प्रवाहच नव्हे आणि म्हणूनच जिथे शोध आहे तिथे साचा नाही. तिथे निर्मळ जीवनाला सतत सामोरा जाणारा प्रवाह आहे.

तसं पाहिलं तर निर्मितीप्रक्रियेच्या गूढ स्वरूपाचं अजून तरी मला आकलन झालेलं नाही. माझ्या नकळत मनात खोल कुठेतरी रुजलेला अनुभूतीचा क्षण मातीचं कवच भेदून वर येणार्‍या हिरव्यागार पात्याप्रमाणे केव्हा आणि कसा प्रकट होतो याचं रहस्य मला अजूनही उकललेलं नाही. तो क्षण अपरिहार्य असतो, अनपेक्षित असतो, एवढंच मी त्याविषयी सांगू शकेन. 'निर्मिती' या माझ्या कवितेत त्या क्षणाची गूढता व्यक्त करण्याचा मी प्रयत्‍न केलेला आहे.
त्या क्षणी या आकृतिचे बंधन,
मलाही माझे नकळत गळले
विदेहीच त्या क्षणी परंतु
आकाराचे रहस्य कळले;
रहस्य कळले अंधारला
कळले नक्षत्रांशी नाते
अन् मी भेदुनि भूमीचा थर
रुजलो होऊनि हिरवे पाते !

या सगळ्याच्या मुळाशी आहेत ते माझ्यावर झालेले संस्कार. वेंगुर्ल्यातल्या बालपणाने माझ्या मनावर चांगले संस्कार केले. माणसाविषयी वाटणारं प्रेम हेच सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे, हाच तो संस्कार. हा संस्कार माझी जीवनदृष्टी घडवणारा संस्कार होता. वेंगुर्ल्याच्या बालपणाने आणखी एक संस्कार मला अगदी खोलवर दिला आणि तो म्हणजे निसर्गाचं प्रेम. या संस्कारानेही माझी कविता व्यापून टाकली. वेंगुर्ल्याचं आमचं घर झाडाफुलांनी वेढलेलं होतं. नाना रंगांचे, नाना सुरांचे पक्षी तिथे खेळत-बागडत असत. समुद्र अगदी घराजवळ होता. त्याची संथ गंभीर गाज रात्रंदिवस कानावर पडायची, सोबत करायची. या समुद्रकिनार्‍यावरची वाळू कापरासारखी पांढरीशुभ्र होती. पाऊस आला की तो किनार्‍यावर सरींचं झाड होऊन झुलायचा. मी अगदी एकटा तासन्‌तास या किनार्‍यावर भटकत असे. एकटेपणात गाणं ऐकण्याची ही कला मला माझ्या वेंगुर्ल्याच्या समुद्राने शिकवली. तसं माझं कवितेशी नातं जडलंय ते माझ्या बालपणीच. माझी आई कविता लिहायची. तिला कवितेचं वेड होतं. केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता ती तल्लीन होऊन मला वाचून दाखवायची. त्या कविता कळण्याचं ते माझं वय नव्हतं, पण त्या तल्लीनतेने मी भारून जात असे. माझी आई माझ्यासारखीच १३-१४ वर्षांची असतानाच कविता करू लागली आणि जेव्हा ती वारली तेव्हा तिची सत्तरी उलटून गेली होती. तिच्या कविता कधी छापून आल्या नाहीत. कवितेमुळे मिळणारं कुठल्याही प्रकारचं यश तिच्या आसपास फिरकलंही नाही. पण तरीसुद्धा मृत्यूच्या काही दिवस अगोदरपर्यंत ती कविता लिहीत होती. मला आठवतं, तिच्या मृत्यूपूर्वी माझ्या नातीचा जन्म झाला- म्हणजे तिची पणती. पणतीला पाहून ती खूश झाली. दुसर्‍या दिवशी मी तिला भेटायला गेलो तर उशाखालचा कागद काढून तिने पणतीवर लिहिलेली कविता दाखवली. माझ्या मनात तोच विचार आला- कसलंही लौकिक यश कवितेने दिलं नसतानाही कवितेवर इतकं जिवापाड प्रेम करण्याचं बळ हिला आलं कुठून? मी जर असाच कवितेच्या क्षेत्रात अयशस्वी ठरलो असतो तर माझ्यात हे त्राण राहिलं असतं का? म्हणूनच मी सारखं म्हणतो की, चार इयत्ता शिकलेल्या माझ्या आईने मला कवितेची नुसती ओळख करून दिली नाही तर तिने मला कवितेचं प्रेम दिलं आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वश्रेष्ठ असा आध्यात्मिक संस्कार होता. या संस्कारामुळेच कुठल्याही कर्मकांडात कधीही न गुंतता मी एक प्रकारच्या आध्यात्मिकतेचा प्रत्यय माझ्या अंतर्यामी माझ्यापुरता घेत आलो.

या सगळ्या कवितेच्या संस्कारात मला मराठी शिकवणार्‍या वा. ल. कुलकर्णी सरांचाही मोलाचा वाटा आहे. वा. ल. कुलकर्णी यांचं वाङ्मयावर अतोनात प्रेम. त्यामुळे वा. ल. जेव्हा कविता वाचून दाखवत, तेव्हा माझ्या दृष्टीने तो एक वेगळाच अनुभव होता. मला अजूनही आठवतं, मी इंग्रजी चौथीत असताना वा. लं. नी 'बी' कवींची 'दीपज्योतीस' ही कविता आम्हाला शिकवली होती. बाहेर पाऊस भरून आला होता. अगदी अंधारून आल्यासारखं वाटत होतं आणि वा. लं. नी ती कविता वाचायला सुरुवात केली. विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले वा. ल. त्या कवितेशी उत्कटतेने जणू एकरूप झाले होते. त्यांनी वाचलेली ती कविता मला आज या क्षणीही जशीच्या तशी ऐकू येते.
"होते वेल रसप्रसन्‍न
फुटुनी येतो फुलोरा तिला"
या ओळीतले 'रसप्रसन्‍न' आणि 'फुलोरा' हे त्यांनी उच्चारलेले शब्द अजूनही मला थरारून सोडतात. कवितेतल्या शब्दांचा उच्चार-ठसा वा. लं. च्या वाचनातून माझ्या मनावर उमटला.

शाळेत असताना कुसुमाग्रजांविषयी प्रचंड आकर्षण होतं. एक दिवस मी वा. ल. कुलकर्णी यांना म्हणालो, "आपल्या शाळेत कुसुमाग्रजांचं काव्यगायन ठेवा म्हणजे मला त्यांना जवळून पाहता येईल आणि त्यांच्याशी बोलता येईल."
कुसुमाग्रजांनी येण्याचं मान्यही केलं आणि त्यांना आणण्याची जबाबदारीही मला मिळाली. मी घोडागाडीतून चक्क कुसुमाग्रजांच्या शेजारी बसून त्यांना शाळेत घेऊन आलो आणि परत जाताना तसंच पोहोचवलं. कुसुमाग्रजांचं काव्यगायन मी भारावल्यागत ऐकलं. 'क्रांतीचा जयजयकार', 'स्मृती' या त्यांनी तेव्हा गाऊन म्हटलेल्या कविता, त्यांच्या चालीसकट आजही माझ्या लक्षात आहेत.

कार्यक्रम संपल्यावर कुसुमाग्रज, वा. लं. बरोबर शिक्षकांच्या खोलीत चहा प्यायला बसले, तेव्हा मी बाजूला उभा राहून टक लावून पाहत होतो. एकदा कुसुमाग्रजांशी ओळख झाल्यानंतर माझा धीर चेपला. मी एक दिवस माझ्या कवितांचं पुडकं घेऊन चक्क 'धनुर्धारी'च्या ऑफिसमध्ये घुसलो. मी कुसुमाग्रजांना माझ्या कविता वाचायला दिल्या. ते हसले आणि "लिहीत रहा" म्हणाले. हा प्रकार मी दोन तीन वेळा केला. पण जराही न वैतागता त्यांनी माझ्या कविता वाचल्या. त्या कवितांवर अर्थातच त्यांची छाप होती. एक दिवस असाच मी त्यांच्या कार्यालयात गेलो असताना 'महाकालीस' ही त्यांची नव्याने लिहिलेली कविता त्यांनी मला दाखवली. 'तांडव करत ये आणि अन्यायाचा विनाश कर.' अशा तर्‍हेचं क्रांतीचं आवाहन करणारी ती कविता होती. आता 'महाकाली' म्हंटल्यावर हिंसाही आलीच. मी घरी आलो. माझ्या डोक्यात तीच कविता होती. त्या काळात महात्मा गांधींचे संस्कार आमच्यावर होतेच. मी तो अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा सूर पकडून कवितेतच कुसुमाग्रजांच्या कवितेला उत्तर लिहिलं आणि ती कविता घेऊन दुसर्‍या दिवशी 'धनुर्धारी'च्या कार्यालयात थडकलो. मी म्हणालो, "मी तुमच्या कवितेला उत्तर लिहिलंय वाचून बघता का?" त्यांना ती कविता आवडली आणि त्या एकाच दिवाळी अंकात कुसुमाग्रजांची कविता आणि माझी कविता कुसुमाग्रजांना उत्तर म्हणून प्रसिद्ध झाली होती. तो दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पुढे माझा प्रसिद्ध झालेला 'त्रिवेणी' हा कवितासंग्रह मी कुसुमाग्रजांना अर्पण केला. तशी माझी पहिली कविता 'तुज पाहिले तुज वाहिले नवपुष्प हृदयातले' ही बोरकरांच्या एका कवितेच्या प्रेरणेतूनच निर्माण झाली. त्यामुळे या दोन्ही महान कवींच्या कवितेचं बोट धरूनच माझी कविता चालायला शिकली.

पुढे १९४९ साली मी प्रथम माझ्या कविता पुण्यात जाहीरपणे म्हटल्या. यानंतर १९५० साली 'धारानृत्य' हा माझा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर आकाशवाणीच्या आणि अन्यत्र होणार्‍या कविसंमेलनातून मला भाग घेण्यासाठी निमंत्रणं येऊ लागली. पुढे १९५२ पासून माझं 'जिप्सी'मधल्या कवितांचं लेखन सुरू झालं. त्यावेळी माझ्या शैलीतही बदल झाला होता. माझ्या शैलीला माझ्या व्यक्तित्वाची ठेवण येऊ लागली होती. अनिल, बोरकर, कुसुमाग्रज, सोपानदेव चौधरी, संजीवनी मराठे अशा अनेक मोठमोठ्या कवींच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकल्या होत्या. त्यांच्या कवितेचा प्रभाव माझ्या कवितेवर होता. नंतर हळूहळू माझ्या अनुभवविश्वाला आकार येऊ लागला आणि माझ्या अनुभवांची अनुभूती माझ्या कवितेतून साकारू लागली. काही अनुभव खोलवर रुजले आणि अनेक वर्षांनंतर ते कवितेच्या रूपाने व्यक्तही झाले. त्या काळात मी आंतरधर्मीय लग्‍न केलं होतं. त्यावेळची यशोदेची मनाची स्थिती 'कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे' या ओळीतून 'असा बेभान हा वारा' या गाण्यात प्रतिबिंबित झाली. तशीच त्यावळेची प्रेमाची अनुभूती अनेक वर्षांनी शब्दबद्ध झाली, 'मी तिला विचारलं तिने लाजून होय म्हटलं, सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं.' किंवा लहानपणी झोपाळ्यावर उंच झोका घेऊन मुलं मला घाबरवत असत, ते कुठेतरी 'सावर रे' या गाण्यात 'सुख मला भिवविते' या शब्दातून व्यक्त झालं. बरं यातले काही अनुभव इतके उत्कट, इतके जोरकस होते की मी सवयीने हस्तगत केलेल्या साच्यात यांत्रिकपणे स्वत:ला शब्दबद्ध करून घेण्याचं त्यांनी नाकारलं आणि मग कवितेची नवी चौकट तयार झाली. यातूनच कवितेचे वेगवेगळे फॉर्म निर्माण झाले. उदासबोध, गझल-न गझल-बोलगझल तसंच मीरा, कबीर हे अनुवाद, प्रासंगिक घटनांवर आधारित मोरूच्या कविता, बोलगाणी, हे सगळं लेखन एक प्रकारचं आंतरिक समाधान देऊन गेलं, एवढं निश्चित.

बोलगाणं हे बोलल्यासारखं गाणं. यातलं गाणेपण मला सतत खुणावत राहिलं म्हणूनच मी नेहमी म्हणतो,
आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे,
फांदीतून पान तसं फुटलं पाहिजे
झर्‍यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे,
गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे

ही प्रेम करणारी माणसं भेटली म्हणूनच माझी कविता बहराला आली. या काही गाण्यांमागे काही घटनाही घडल्या. एकदा मी सकाळी फिरायला बाहेर पडलो. तिथे राहाणारे एक म्हातारे गृहस्थ मला रस्त्यात भेटले. त्यांची डावी बाजू लुळी पडली होती. त्यामुळे साहजिकच मी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, तर मला म्हणाले, "पाडगावकरसाहेब, तुम्ही कवी आहात म्हणून तुम्हाला सांगतो. अहो, मी आमच्या घरी कुंडीत एक फुलाचं रोप लावलं. सतत १५ दिवस त्याला पाणी घातलं आणि अहो, आज सकाळी त्या झाडाला फूल फुललं." आता लुळं पडलेलं अर्धाग ही वस्तुस्थिती होती आणि कुंडीत उमललेलं फूल हीदेखील वस्तुस्थितीच होती. पण तब्येतीची कुरकुर सांगण्यापेक्षा त्यांना फुलाची गोष्ट सांगणं जास्त आवडलं. यावरूनच मी बोलगाणं केलं.
सांगा कसं जगायचं. कण्हत कण्हत की
गाणं म्हणत तुम्हीचऽ ठरवा.

असे अनेक अनुभव माझ्या लेखणीतून साकारले. माझ्या कवितेने मला नवनिर्मितीचा आनंद दिला. याच नवनिर्मितीच्या प्रेरणेतून मी माझं माणूसपण खर्‍या अर्थाने अनुभवलं आणि जपलंही. कुठल्याही साच्यात न अडकता जीवनाप्रमाणे सतत प्रवाहित राहण्याचा प्रयत्‍न माझ्या कवितेने केला. मला असं वाटतं की कवीची कविता ही त्याने स्वत:शी आणि जीवनाशी राखलेलं सर्वश्रेष्ठ इमान आहे. या विचारांची साखळीही माझ्या कवितेत उतरली आहे. मला वाटतं माझ्या गाण्याने मला जगण्याचं बळ दिलं म्हणूनच मी माझं जीवनगाणं आनंदाने गाऊ शकलो, असं लिहू शकतो,
गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे
(संपादित)

मंगेश पाडगांवकर
सौजन्य- दै. लोकसत्ता (११ मे, २०१३)
(Referenced page was accessed on 31 May 2019)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.