A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गर्द सभोंतीं रान साजणी

"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी !
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"

ती वनमाला म्हणे, "नृपाळा, हें तर माझें घर
पाहत बसते मी तर येथें जललहरी सुंदर."

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी तुला;
तूं वनराणी, दिसे भुवनीं ना तुझिया रूपा तुला.

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी,
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."
गीत - बालकवी
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- आशालता वाबगावकर
नाटक - मत्स्यगंधा
राग - बैरागी भैरव
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• काव्य रचना- मे १९३६.
तुला - उपमा.
नृपाळ(ल) - राजा.
मोहना - मोह पाडणारी स्‍त्री.
रमणी - सुंदर स्‍त्री / पत्‍नी.
'निसर्ग' हा बालकवींचा स्थायीभाव. त्यांच्या खर्‍या आवडीचा विषय. निसर्ग हा 'किट्स'प्रमाणे बालकवींचा आंगिक भाव आहे. म्हणूनच स्वत:ची सुखदु:खे ते निसर्गात पाहू शकतात. निसर्गाचे इतक्या आत्‍मीयतेने आणि तन्मयतेने दर्शन कोणी घेतले नसेल ! निसर्गाशी ते समरस झाले होते. सत्याच्या अधिक जवळ जाऊन बोलायचे तर निसर्गालाच त्यांनी आपल्या भावविश्वात सामावून घेतले होते.

बालकवींच्या काव्यसंभारात प्रेमकवितांची संख्या फारच मोजकी आहे. त्यातही 'प्रेम' या अनुभवाचे चित्रण करण्यापेक्षा 'प्रेम' या विषयाचे महात्‍म्‍य सांगणार्‍या कविता अधिक आहेत. 'तूं तर चाफेकळी' ही कविता बालकवींच्या सुंदर प्रेमकवितांपैकी एक. कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगावयाचे तर 'बालकवींच्या काव्य भांडारातील हे एक मनोहर रत्‍न आहे.' कविता अपूर्ण आहे. कधीकधी अपूर्ण कविताही पूर्णतेपेक्षा अधिक हुरहूर लावून जाते. या कवितेच्या बाबतीत रसिकांना हा अनुभव येतो. बालकवींनी काही कथाकाव्ये रचण्याचा प्रयत्‍न करून पाहिलेला दिसतो. त्या कथाकाव्याचा एक भाग या कवितेच्या रूपात त्यांनी आपल्यासमोर ठेवला असावा.

ही दोघांची प्रीतीकथा. कवितेचा प्रारंभच मुळी राजाच्या प्रश्‍नाने झालेला असल्यामुळे कवितेला एकदम गती मिळते. त्या प्रेमानुभवावरच आपले लक्ष केंद्रीत होते. अकारण तपशील टाळलेला असल्यामुळे कवितेला रेखीवपणातून लाभलेला डौल प्राप्त झालेला आहे. प्रेमाच्या दुनियेत पुरुषाने पुढाकार घ्यावा हे अगदी स्वाभाविक. या दोघांच्या संवादामुळे कवितेला नाट्यगीताचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तिच्या रूपसौदर्याने तो मुग्‍ध झालेला आहे आणि प्रीतीचा अंकुर त्याच्या मनात निर्माण झालेला आहे.

'तर' या शब्दात कितीतरी मधुर भावछटा सूचित झालेल्या आहेत. वनमालेने गर्द रानात नदीकाठी असू नये तर असावे तरी कोठे? एवढा मोहक अर्थ या 'तर' मध्ये सामावलेला आहे. 'चाफेकळी' या शब्दाने तिच्या सौंदर्यातील मुग्‍ध अस्‍फुटपणा, तिचा चाफेगौर रंग कवीने सूचित केला आहे. चित्रदर्शी शैलीने त्या सुंदरीचे चित्र कवीने साकार केलेले आहे.

प्रियकराच्या आवाहनाला तिने साद दिली की नाही ते कवीने सांगितले नाही. पण.. 'दंवाचे थेंब झाडाच्या पानावर सुंदर दिसतात पण हात लागताच ते नाहीसे होतात.' असे सांगून कवीने प्रेमातील उदात्तता सूचित केली आहे. राजाच्या आवाहनाला तिने दिलेले उत्तर अपूर्ण असले तरी नितांत मधूर आहे. त्यात मनाची कोवळीक, सौंदर्याची जपणूक, कल्पनेची हृद्यता जाणवावी. प्रत्येक शब्दात एकेक देखणे चित्र लपलेले आहे. संवादामुळे कवितेला नाट्यगीताचा घाट लाभलेला आहे. 'स्त्रीपुरुष प्रेमाचे हे चित्रण असले तरी त्यांत धग जाणवत नाही.' हे डॉ. वाळिंब्‍यांचे म्हणणे खरे आहे. पण त्यामुळे परिणाम दृष्ट्या उत्‍कटता मुळीच कमी होत नाही.
(संपादित)

डॉ. वा. पु. गिंडे
बालकवींची कविता, आकलन आणि आस्वाद
सौजन्य- पारख प्रकाशन, बेळगांव.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.