अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम, आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार?
कधीही तारांचा संभार?
क्रुद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही ! अम्हांला कसले कारागार?
अहो, हे कसले कारागार?
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यांत ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुजला ठरलो वेडेपीर
देशिलना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई, वेड्यांना आधार !
कशास आई भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई, खळाखळा तुटणार
आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर सुखेनैव या, सुखेनैव संहार
मरणा, सुखनैव संहार
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
अर्घ्य | - | पूजा / सन्मान. |
तडित | - | वीज. |
तांत | - | धागा / आतड्याची तार. |
प्रणिपात | - | नमस्कार, वंदन. |
सुखेनैव | - | सहज. |
संभार | - | संग्रह / समुदाय / सामग्री. |
क्रांतिकारकाच्या मनाच्या कणखर व भावकोमल अशा दोन्ही अवस्था आलेखित करणारी ही कविता आपोआप भव्योज्ज्वल रूप घेते. ह्या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील डमडमच्या तुरुंगातील तत्कालीन संदर्भ ती सहजपणे टाकून देते. इतकेच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचाही संदर्भ ती टाकून देते.. आणि उरते ते एका कुठल्याही प्रदेशातल्या, कुठल्याही काळातल्या क्रांतिकारकांच्या अदम्य, अविचल, समर्पणशील अन् प्रखर ध्येयासक्तीच्या रूपात.
या कवितेचे 'विशाखा'च्या पहिल्या आवृत्तीतील 'डमडमच्या तुरुंगात' हे शीर्षक कुसुमाग्रजांनी पुढील आवृत्त्यांत बदलून 'क्रांतीचा जयजयकार' असे केले, हे अगदी योग्य झाले. कारण त्यामुळे या कवितेची सार्वत्रिकता वाढली. तिची आवाहकतेची कक्षा असीमतेपर्यंत विस्तारली.
ही कविता सर्वच टीकाकारांनी गौरविलेली आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे समकालीन राजकीय चळवळीत पडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ती एखाद्या स्तोत्राप्रमाणे पठण केली होती. तुरुंगात असताना सर्व राजकीय बंदी संध्याकाळी एकत्र ही कविता म्हणत. तिच्यातून त्यांना बळ मिळे अशी आठवण स्वातंत्र्यसैनिक श्री. ना. ग. गोरे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. बा. भ. बोरकरांनी या कवितेचा पोर्तुगीज भाषेत अनुवाद करून तो त्यांनी आई मानलेल्या एका पोर्तुगीज वृद्धेला ऐकविला, तेव्हा तिने "ही कविता म्हणजे फ्रेंच राष्ट्रगीताहूनही श्रेष्ठ अशी रचना आहे." अशा स्वरूपाचे उद्गार काढले होते.
या कवितेला एक सुंदर शैली लाभलेली आहे. ती तिच्यातील जोरकस आशयाचा चांगला पाठपुरावा करणारी आहे. गीतरचनाही क्रांतिकारकांचा क्रांतीवरचा विश्वास, क्रांतीचा निर्धार आणि त्या क्रांतीकरिता आत्मार्पण करण्याची सोत्सुक प्रतिज्ञा अभिव्यक्त करणारी आहे. 'पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?', 'बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान' किंवा 'रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर' इत्यादी प्रमाणे येण्यार्या ओळींतून क्रांतिकारकांच्या मुखातून त्यांची अदम्य स्वातंत्र्याकांक्षा व तिच्यासाठी कुठलीही यातना सोसण्याची त्यांनी ठेवलेली मनाची तयारी व्यक्त होते. 'श्वासांनो, जा वायुसंग..' हे कडवे जितके भावकोमल आहे तितकेच 'कशास आई..' हे कडवे कडकडीत निर्धार व्यक्त करणारे आहे.
'क्रांतिचा जयजयकार' ही कुसुमाग्रजांची सर्वाधिक प्रसिद्ध कविता आहे. इतकी की ही कविता म्हणजेच कुसुमाग्रज किंवा कुसुमाग्रज म्हणजे ही कविता असे एक समीकरण मराठी मनात दृढमूल झालेले आहे.
(संपादित)
डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.