A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन ओथंबून येती

घन ओथंबून येती
बनांत राघू ओघिरती
पंखावरती
सर ओघळती
झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती
नदीस सागरभरती
डोंगरलाटा
वेढित वाटा
वेढित मजला नेती

घन ओथंबून आले
पिकात केसर ओले
आडोशाला
जरा बाजूला
साजण छेलछबिला
घन होऊन बिलगला
ना. धों. महानोरांचे एक वैशिष्ट्य- यांच्या कवितेला निसर्ग, खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही. खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद, शेताचे सृजन ते ह्याचे सृजन !

कवी काव्य का लिहतो? "अनुभवांच्या अभिव्यक्तीची आंतरिक निकड" हा एक निकष मानला तर समजणे थोडे सोपे जाईल. हा कवी खेडेगावात जन्मला, शेतकरी म्हणून वाढला. कविता लिहिल्या, विधान परिषदेत गेला, तरी शेतकरीच राहिला. त्यामुळे सगळे अनुभव या गोष्टींशीच निगडित. हा लळा इतका गाढ कीं कवी व निसर्ग एकरूपच होऊन गेले आहेत असे वाटावे. दोन उदा. बघून मग वरील कवितेकडे वळू.

(१) या नभाने या भुईला दान द्यावे
     आणि माझ्या पापणीला पूर यावे

(२) ज्वार उभार, गर्भार,
     हिरव्या पदराला जर,
     निर्‍या चाळताना वारा
     घुसमटे अंगभर.

पहिल्यात मेघांनी भुईला दान दिले व पाणी कवीच्या डोळ्यांत आले तर दुसर्‍यात ज्वार गर्भार ! माणुस निसर्गात व निसर्ग मानवात एकरूप होऊनच कवितेत येतात. या वर जरा जास्त लिहावयाचे असल्याने येथे थांबू व कवितेकडे वळू.

घन ओथंबुन आल्यावर प्रथम कवी वनात बघतो, मग आजुबाजुला नदीनाल्यात व शेवटी शिवारात.. एकदा कावळे, कबुतरे व पोपट कसे उडतात ते बघाच व मगच 'घिरघिरती' याचा आनंद लुटा. पंखांवरचे पाणी झाडावर झडझडते यात 'झ' व 'ड' याची पुनरुक्ती महत्वाची नाही, जोरदार पावसात झाडाखाली भिजण्याकरिता उभे रहा व झडझडणारे पाणी उपभोगा.

आता हा पाऊस नदीत पडतो आहे. त्याने नदीला सागरभरती आणली, नदी ही सागरासारखी झाली आहे आणि लाटा डोंगरलाटा झाल्या आहेत. मला पहिल्यांदी ही अतिशयोक्ती वाटली पण या पावसाळ्यात नदीत बोट उलटी होऊन ३६ स्त्रीया बुडल्याचे वाचून या डोंगरलाटांची कल्पना आली. नदीवर पाणी भरावयाला जाण्याच्या वाटा आता वाटा रहिल्या नाहीत, ते ओसंडून वाहाणारे ओढे झाले आहेत. रोजची पायाखालची वाट पाण्याने वेढली नाही, तीच्यांबरोबर हीही वेढली गेली आहे. निसर्गाबरोबरची समरुपता तीलाही संगतीने घेऊन जात आहे.

खरी बहार तिसर्‍या कडव्यात आली. शिवारातल्या फुलांतले केसरच ओले झाले असे नव्हे; ही भिजली व तीला आठवण कसली झाली? छेलछबिल्या, साजणाची. जरा आडोशाला बिलगणार्‍या साजणाची. आणि इथे हा घनच साजण झाला आहे. खरा रसिक दिसतो नाही? (तेच पुरुष भाग्याचे !)

कवितेत निसर्ग व माणुस आपापल्या भुमिका कशा सहजतेने बदलतात पहा. लयही नैसर्गिक आहे.
(संपादित)

शरद
* या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास aathavanitli.gani@gmail.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.

सौजन्य- उपक्रम (mr.upakram.org) (१ जुलै, २००८)
(Referenced page was accessed on 31 July 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.