A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन तमीं शुक्र बघ

घन तमीं शुक्र बघ राज्य करी,
रे खिन्‍न मना, बघ जरा तरी!

ये बाहेरी अंडें फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणीं,
कां गुदमरशी आंतच कुढुनी?
रे! मार भरारी जरा वरी.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेल जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?

मना, वृथा कां भीशी मरणा?
दार सुखाचें तें हरि-करुणा!
आई पाही वाट रे मना,
पसरोनी बाहु कवळण्या उरीं.
गीत- भा. रा. तांबे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २९ ऑक्‍टोबर १९२०.
• साक्षात्काराचा हा प्रथम किरण आहे. नैराश्य, खिन्‍नता, भीती ही ज्याचीत्याची स्वत:ची निर्मिती. विश्वाच्या सत्य स्वरूपात त्यास अवकाश नाही.