A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घेई छंद मकरंद

घेई छंद मकरंद- प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद, धुंद

मिटतां कमलदल होई बंदी भृंग
परि सोडिना, ध्यास, गुंजनात दंग
गीत - पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- पं. वसंतराव देशपांडे
पं. जितेंद्र अभिषेकी
प्रसाद सावकार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - कट्यार काळजात घुसली
राग - सलगवरली, धानी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• स्वर- पं. वसंतराव देशपांडे, राग- धानी.
• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, राग- सलगवराळी, ताल झपताल.
मरंद (मकरंद) - फुलातील मध.
मिलिंद - भ्रमर, काळा भुंगा.
'कट्यार काळजात घुसली' ही नाट्यकृती ज्या 'लागी कलेजवा कटार' ठुमरीमुळे जन्माला आली ती हिंदी रचना, आणि एकूण नाटकातील नांदी, पदे, भावगीते, रागमाला- काव्यपंक्ती इत्यादी मराठी रचना माझ्याच असल्या तरी संगीत दिग्दर्शक श्री. जितेंद्र अभिषेकी यांच्या सूचनेनुसार ज्यांच्या कृतींचा इथे समावेश करण्यात आला, त्या सर्व रचनाकारांचा मी व्यक्तिशः ऋणी आहे. 'दिन गेले भजनविण सारे ' हा संत कबिराच्या 'बीत गये दिन भजनविना' या भजनाचा मी केलेला स्वैर अनुवाद आहे.

दुसर्‍या अंकातील कव्वाली बहुधा पारंपरिक असावी. सुमारे तीस वर्षापूर्वी माझ्या बालपणी मी ती प्रथम ऐकली. कर्ता मला तरी अज्ञात आहे.

पहिल्या अंकात कविराज बांके बिहारी यांच्या मुखी असलेला 'छंद'- "चकित चकत्ता चौकि … छाती धरकति है" या चार पंक्ती कविराय भूषण यांच्या 'सिवा बावनी' मधून घेतलेल्या आहेत.

श्री अभिषेकी यांनी 'खांसाहेबांच्या रियाझात' ज्यांचा औचित्यपूर्ण उपयोग केला त्या चिजा (वा बंदिशी) पारंपरिक आहेत.
'कवन देस कवन नगरिया में'
'खुश रहे सनम मेरा'
'सुरत पियाकी न छिन बिसराये'
-इत्यादी.

दुसर्‍या अंकात 'रागमाले'त रागस्वरूप दर्शनाची झलक म्हणून,
'मानत नाही जियारा मोरा' (मुलतानी )
'बंगरी मोरी प्यारे जिन छुओ' (यमन)
'सजन इत आवन कह गयो आज' (जयजयवंती)
'दिर दिर तन तदीम तन तदियनरे' (अडाणा - तराणा)
'सखि निकसो जात है प्राण शरीर' ( दरबारी - धमार )
'दिर दिर दिर दिर तनोम्' (भैरवी - तराणा)

इत्यादी पारंपरिक रचनांचा उपयोग श्री. अभिषेकी यांनी केला आहे.

श्री अभिषेकी यांनी 'खांसाहेबांच्या रियाझात' ज्यांचा औचित्यपूर्ण उपयोग केला त्या चिजा (वा बंदिशी) पारंपरिक आहेत.

तिसर्‍या अंकात शेवटी 'सदाशिव'च्या मुखी असलेली 'भूला भटका पथहारा' ही रचना स्वतः श्री. अभिषेकी यांची आहे.

आणि सर्वात मोठे ऋण-
श्री प्रभाकर पणशीकर आणि श्री. जितेंद्र अभिषेकी या दोन मित्रांचे !
हे दोघे (अनुक्रमे) निर्माता आणि संगीतनियोजक म्हणून माझ्या पाठीशी नसते तर ही कृती रंगमंचावर आलीच नसती.
ज्याला 'नांदी'त आळवले तो नटेश्वर, ह्या दोन कलावंतांना सुयश, समृद्धी आणि दीर्घायुरारोग्य देवो !
(संपादित)

पुरुषोत्तम दारव्हेकर
'कट्यार काळजात घुसली' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. वसंतराव देशपांडे
  पं. जितेंद्र अभिषेकी
  प्रसाद सावकार