A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोंडा फुटला दिसाचा

गोंडा फुटला दिसाचा जसं जास्वंदीचं फूल
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल

माय माय म्हणताना सय माउलीची आली
माउलीच्या मागं मला दादा तुझीच साउली
देह नांदतो सासरी मन माहेरा निघालं
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल

भाऊ माझा तालेवार, बारा बैल दावणीला
उभा पाठीशी सावळा काय उणं बहिणीला?
सार्‍या गावाहून चढं असं धनत्तर कूळ
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल

माझं मागणं ते किती, तुझं देणं भारंभार
माझी चोळीची रे आशा, तुझा जरीचा पदर
झोपडीला या आधार दादा तुझं रे राऊळ
माय धरित्रीच्या दारी पडे देवाचं पाऊल
तालेवार - श्रीमंत / प्रतिष्ठित.
धनत्तर - श्रीमंत.
राऊळ - देऊळ.