A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुणि बाळ असा जागसि कां

गुणि बाळ असा, जागसि कां रे वायां ।
नीज रे नीज शिवराया ॥

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ।
तरि डोळा लागत नाहीं ।
हा चालतसे चाळा एकच असला ।
तिळ उसंत नाहिं जिवाला ।
निजवायाचा हरला सर्व उपाय ।
जागाच तरी शिवराय ।
चालेल जागता चटका ।
हा असाच घटका घटका ।
कुरवाळा किंवा हटका ।
कां कष्टविशी तुझी सांवळी काया? ।
नीज रे नीज शिवराया ॥

ही शांत निजे बारा मावळ थेट ।
शिवनेरी जुन्‍नरपेठ ।
त्या निजल्या ना, तशाच घाटाखालीं ।
कोंकणच्या चवदा ताली ।
ये भिववाया बागुल तो बघ बाळा ।
किति बाई काळा काळा ।
इकडे हे सिद्दी-जमान ।
तो तिकडे अफजुलखान ।
पलीकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया ।
नीज रे नीज शिवराया ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर
इंदुमती चौबळ
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा
  
टीप -
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर.
• स्वर- इंदुमती चौबळ, संगीत- ???.
चटका - चाळा.
जमान - विजापूरचा (आदिशाही) सरदार रूस्तम जमान ख़ान.
ताली - परगणे. (परगणा- देशाचा एक मोठा भाग.) (शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे या माहितीसाठी आभार.)
मुलुखमैदान - विजापूरची सुप्रसिद्ध प्रचंड तोफ.
सिद्दी - मुरुड-जंजिरा येथील हबशी सिद्दी जौहर.
पृथक्‌

कै. गडकरी यांच्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित वाङ्मयाचे हक्क आमच्याकडे असल्यामुळे, कै. राम गणेश गडकरी यांच्या हस्तलिखित टांचणांवरून त्यांच्या 'संगीत राजसंन्यास' या अपूर्ण नाटकाचे पुस्तकरूपाने प्रकाशन करीत आहोत.

कै. राम गणेश गडकरी यांच्या उपलब्ध असलेला संक्षिप्त टांचणांच्या आधारानें व त्यांनी स्वतः आपल्या मित्रमंडळींना संविधानकासंबंधी वेळोवेळी जी माहिती सांगितली, तिजवरून कांही कांहीं मुख्य प्रवेशांची अगदीं स्थूलमानाने कल्पना देण्याचा हा प्रयत्‍न आहे.

प्रकाशक :
गो य राणे
नेर्लेकर बुकसेलर्स यांचेकरितां
बुधवार चौक
पुणें २

अर्पण-पत्रिका
इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे, तेव्हां विश्वासानें ती मुकाट ऐकून घ्यायला हवीच. थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता. हें 'समर्थाघरींचें श्वान' खरोखरीच सर्वांनीं मान देण्यासारखें होतें. हा इमानी जीव आबासाहेबांना कधींहि विसंबत नसे. अखेर, प्रभूचें शुभावसान झाल्याबरोबर, त्या मुक्या इमानानेंहि त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर, त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाशीशेजारीं मांडीला मांडी लावून बसलेली, तिन्ही लोक डोळ्यांनीं पाहत आहेत. त्या समाधीवर, त्या चतुष्पाद पशूची पूजा बांधण्यासाठीं, नरदेहाचा नसता अभिमान सोडून, माझ्या या 'राजसंन्यासा'च्या पामर बोलांची, डोंगरपठारीवरच्या या रासवट रानफुलांची, पांखरण करून ठेवीत आहे.
- राम गणेश गडकरी

नाटकाच्या नांदीविषयी-
मुख्य पडदा उघडताच आंत झिरझिरीत जाळींदार पडदा दृष्टीस पडतो. त्यामधून पलीकडे मालवणच्या सिंधुदुर्गासमोरील समुद्राचा देखावा दिसत आहे. सूर्य मावळण्याचा सुमार असून दर्या तुफान खवळलेला आहे. लाटातून उसळणार्‍या तुषारांनीं हिममय झालेल्या वातावरणात मराठी रियासतीभोवर्ती जागत्या डोळ्यांनीं पहारा करीत असलेल्या पाच देवींच्या अस्पष्ट आकृति शिवनेरीच्या बाळाला निजविण्यासाठीं 'पाळणा' गात आहेत, असा अद्भुतरम्य देखावा नजरेस पडतो. 'पाळणा' गाऊन संपल्यावर देवता नाहीशा होतात व जाळीदार पडदा दूर होऊन पहिल्या प्रवेशास सुरुवात होते.

पांच देवींचा पाळणा (नांदी)-
गुणि बाळ असा, जागसि कां रे वायां
नीज रे नीज शिवराया …
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरि डोळा लागत नाहीं
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाहिं जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय ।
जागाच तरी शिवराय ।
चालेल जागता चटका ।
हा असाच घटका घटका ।
कुरवाळा किंवा हटका ।
कां कष्टविशी तुझी सांवळी काया? ।
नीज रे नीज शिवराया ॥
ही शांत निजे बारा मावळ थेट ।
शिवनेरी जुन्‍नरपेठ ।
त्या निजल्या ना, तशाच घाटाखालीं ।
कोंकणच्या चवदा ताली ।
ये भिववाया बागुल तो बघ बाळा ।
किति बाई काळा काळा ।
इकडे हे सिद्दी-जमान ।
तो तिकडे अफजुलखान ।
पलीकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया ।
नीज रे नीज शिवराया ॥

(संपादित)

'राजसंन्यास' या राम गणेश गडकरी यांच्या अपूर्ण नाटकाच्या हस्तलिखितातील प्रकाशित नोंदीवरून.

* ही प्रकाशकाची / लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  लता मंगेशकर
  इंदुमती चौबळ