A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरि उच्‍चारणीं अनंत

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥

तृण अग्‍निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथें ॥३॥

ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
रचना-संत ज्ञानेश्वर
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
गीत प्रकार - संतवाणी
भेणे - भिणे.
भावार्थ-

उपनिषदांनाही परमेश्वर अगम्य आहे. परंतु संसारतापातून सोडविण्यास त्याच्याएवढा समर्थ कोण? परमेश्वर समर्थ तर आहेच; परंतु त्याच्या नामाचा महिमाही अगाध आहे. हरिनामाचा केवळ उच्चार करताच भक्ताची सारी पापे नष्ट होऊन जातात. अग्‍नीचा स्पर्श होताच गवत उरेल का? गवत केवळ नष्ट होऊन जाते एवढेच नाही, तर ते अग्‍नीशी समरस होऊन जाते.. अग्‍निमय होऊन जाते. तसे नामाचे सामर्थ्य आहे. नामोच्चारणासरशी या नश्वर जगतातल्या सगळ्या बाधा भिऊन पळून जातात आणि आपण परमेश्वरस्वरूप होऊन जातो.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे

  इतर भावार्थ

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  आशा भोसले