A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हसलीस एकदा भिजल्या शारद

हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशिगंधाची नाती

लेऊन शुभ्रतर किरणांचे फूलपंख
चरणांतून पेरीत प्रीत-पैंजणे लाख
उधळीत अशी तू आलीस भावूक स्वाती

तू हसून बोललीस, होऊन लज्जीत थोडी
उलगडली नयनी तुझ्या गुलाबी कोडी
नजरेतून झरल्या प्रणयधुंद बरसाती

हे युगायुगांचे प्रीतीचे अनुबंध
तेजातून उजळीत हृदयातील आनंद
येईल निशेच्या दारी सौख्य प्रभाती
स्वाती - पंधरावे नक्षत्र. (स्वाती पाऊस- स्वाती नक्षत्राचा पाऊस. यामुळे मोती तयार होतात, अशी कल्पना आहे.)

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.