A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हवास मज तू हवास

हवास मज तू हवास सखया

हृदयी माझ्या भाव उसळती
ओठांवरती शब्द नाचती
रचावया परि कवितापंक्ती
हवास मज तू हवास रे !

भुलविति सुखविति रसिक मनाला
सुमनांचा मी संचय केला
गुंफाया परि मोहक माला
हवास मज तू हवास रे !

असे कुंचली, रंगही असती
धवल फलकही आहे पुढती
रेखाया परि रम्य आकृती
हवास मज तू हवास रे !

स्‍नेहही आहे, आहे पणती
मंदिरातल्या मूर्तीपुढती
उजळाया परि जीवनज्योती
हवास मज तू हवास रे !
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- लीला पाठक
चित्रपट - दहा वाजतां
ताल-केरवा (मात्रा- ४)
गीत प्रकार - चित्रगीत
कुंचला - रंग देण्याचा ब्रश.
सुमन - फूल.
मुख्य घटना 'दहा वाजतां' घडणे, 'दहा वाजतां' प्रेमिकांनी एकमेकांचे स्मरण करणे, या अजब कल्पनेवर कश्यपने एक तुटपुंजे कथानक लिहिले होते. तेच नीटनेटके करून पटकथा लिहिली. गाणी शांताराम आठवले लिहिणार होते. गोष्ट ठराविक साच्यातली प्रेमकथा.. म्हणजे प्रेमगीतांना वाव देणारी !

'हवास मज तू हवास सखया' असे पहिले प्रेमगीत नायिका आपल्या खोलीत म्हणते. अद्ययावत्‌ सजविलेली खोली. वातावरण, सजावट अगदी फॅशनेबल ! मग संगीतरचनाही तशीच असायला हवी. चाल चटकदार पण सोपी, 'हवास' या शब्दास विशेष उठाव देणारी. जसजसे विविध भाव अंतर्‍यामागून अंतर्‍यात व्यक्त होत जातात, तसतशी चाल विविध तर्‍हेने पण अनुरूप स्वरांच्या गुंफणीने, वळणे घेत जाते. पुन्हा 'हवास' या शब्दाला कवितेत नायिकेच्या दृष्टीने जे विशेष अगत्याचे, अपरिहार्य स्थान आहे, ते पोषक स्वरांनी पुन:पुन्हा उठावदार करण्याचे कार्य मी पार पाडले. शेवटच्या अंतर्‍याच्या ओळीवर, 'स्‍नेहही आहे, आहे पणती..', पियानोवर फारच पोषक 'कॉर्डस्‌' वादकाने वाजविल्या आहेत. तालमीमध्ये मी त्याला आधीच समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे त्यानेही निरनिराळ्या कॉर्डस्‌ मला वाजवून दाखविल्या होत्या. त्यातल्या विशेष पोषक निवडून मी गाण्याच्यावेळी ऐकून पक्क्या केल्या. त्याचप्रमाणे सॅक्सोफोन, ट्रंपेट, व्हायलिनवरही असेच.. पोषक हार्मनी निर्माण करणार्‍या स्वरांचे वादन पक्के केले. हे सर्व नीट बसविल्यावर, मगच राजा नेने यांना ऐकविले. शांताराम आठवले रोजच ऐकत होते. आपल्या प्रतिक्रिया वारंवार व्यक्त करीत होते. त्यांचे मार्गदर्शन नेहमीप्रमाणे मिळत होते.

एकाच वेळी पियानो-ऑर्गनवर तीन स्वर वाजाविले तर त्यांना कॉर्ड म्हणतात (उदाहरणार्थ, सा-ग-प). पियानोवादक डाव्याउजव्या हाताने या कॉर्डस्‌ वाजवतात, तालांत. पाश्चिमात्य संगीत त्यांच्या पद्धतीने शिकलेल्या गायकवादकांना कॉर्डस्‌ पूर्ण परिचित असतात. मोठमोठ्या संगीतकारांचे नोटेशनने लिहिलेले छापील संगीत वारंवार पाहून वाजविल्यामुळे, अनेक वर्षांच्या सवयीने, या कॉर्डस्‌चा त्यांनी केलेला उपयोग या वादकांच्या डोक्यात चांगलाच ठसलेला असतो. आमच्या पद्धतीने शिकलेल्या लोकांना याचा कसून अभ्यास व श्रवण केल्याशिवाय हे कॉर्डस्‌ प्रकरण कळत नाही. हल्लीच्या आमच्या बर्‍याच संगीत दिग्‍दर्शकांना त्यांच्या किरिस्ताँव वादकांचे हार्मनीबाबत संपूर्ण सहाय्य अस्ते. ते काम तेच करतात. आम्ही ते काम करतो पण काही ठराविक आडाख्यांच्या अनुरोधाने.. त्यात प्रतिभेचा अंश अजिबात नसतो. असे ख्रिश्चन साहाय्य्क संगीत दिग्‍दर्शक बाळगून असततात. त्यात काहीही गौणपणा वाटण्याचे कारण नाही. कारण हार्मनीसंगीत आपल्या अभ्यासाचे वा व्यास्गाचे नाही. आमच्यातले काही लेखक हार्मनीचे श्रेय अशा संगीत दिग्दर्शकांना देतात ते अज्ञानामुळे. ते श्रेय त्यांच्या ख्रिश्चन साहाय्यकांकडे जाते.
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.