तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत । तूही दुस्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
गीत | - | गोपाळकृष्ण भोबे |
संगीत | - | पं. भीमसेन जोशी |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | धन्य ते गायनी कळा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, प्रार्थना |
आदि (आधी) | - | प्रारंभ / प्रमुख. |
दुस्तर | - | पार करण्यास अवघड. |
भव | - | संसार. |
'शापित गंधर्व' ही बिरुदावली सार्थ ठरविणारे कै. गोपाळकृष्ण भोबे यांची 'धन्य ते गायनी कळा' ही पहिलीच आणि दुर्दैवाने शेवटचीच, नाट्यकलाकृती रसिकांपुढे सादर करताना ऊर आनंदाने आणि धन्यतेनेही भरून येत आहे आणि त्याबरोबरच डोळ्यांत दुःखाश्रूही गर्दी करीत आहेत. अवघी हयात अक्षरशः तहानभूक विसरून संगीताच्या उपासनेत रमणारे गोपाळकृष्ण भोत्रे हे मराठीतले अव्वल दर्जाचे शैलीदार लेखक.
सूरसम्राट तानसेन यांच्या जीवनावर नाट्यकृती निर्माण करण्याचा ध्यास घेतलेले भोबे, जणू काही या कलाकृतीच्या निर्मितीबरोबर आपले जीवितकार्यच संपले, अशा भावनेने अक्षरशः परमेश्वरचरणी आत्मार्पण करून निघून गेले. आपल्या पहिल्याच नाट्यापत्याचे रसिकजन कसे काय कोडकौतुक करतात हे पाहण्यास कै. भोबे आमच्यांत असावयास हवे होते. पण-
कै. भोबे हे आमच्या मित्रपरिवारांतले. संस्थेवर त्यांचे अकृत्रिम प्रेम. नाट्यव्यवसायात अपरिहार्यपणे येणार्या अडीअडचणींत त्यांच्या सल्लामसलतीचा शब्द ऐकला की आम्हांला नवे बळ यायचे. अशा आमच्या एका सच्च्या हितचिंतकाचे पहिलेवहिले नाटक प्रकाशात आणण्याच्या आनंदाचा, हा साधन्यतेचा क्षण आम्ही उपभोगताना कै. भोबे आज आमच्यांत नाहीत, या जाणिवेचे विषण्ण सावट आलेले आहे. अभिजात संगीताचे सूर हवेत विरताहेत न विरताहेत तोच त्यांचा मागोवा घेत घेत भोब्यांचा आत्माही प्रेक्षागृहाच्या काळोखात रेंगाळत असेल, तृप्त होत असेल...
भोब्यांचे नाटक म्हणताच त्यांचे मित्र, चहाते व आमचे ऋणानुबंधी मदतीचा हात घेऊन पुढे सरसावले. संस्थेवर ज्यांचा मनापासून लोभ आहे, असे आमचे सुहृद नाटककार श्री. वसंतराव कानेटकर यांनी हस्तलिखित प्रत प्रयोगशील करण्यासाठी घेतलेले श्रम संस्थेप्रमाणे भोब्यांवरीलही प्रेमाचे द्योतक आहे. अखिल भारतीय कीर्तीचे संगीतकार पंडित भीमसेन जोशी ह्यांच्यासारख्याचे संगीत-दिग्दर्शन या कलाकृतीला लाभावे यापरते दुसरे भाग्य कोणते !
संस्थेचे एक हितचिंतक, आमचे स्नेही व महाराष्ट्राचे थोर प्रतिभावंत, कविवर्य कुसुमाग्रज यांनी काही गीतरचनेच्या बाबतीत आपुलकीने हातभार लावला. मराठी रंगभूमीवरील मान्यवर नाट्यदिग्दर्शक श्री. मो. ग. रांगणेकर यांनी तर दिग्दर्शनाचे काम घरचेच मानले. त्यांचा संस्थेवरील लोभ व त्यांचा वडीलकीचा वेळोवेळी लाभत असलेला सल्ला हा एक मोठा आधार. सुप्रसिद्ध संगीत गायिका माणिक वर्मा आणि त्यांचे यजमान श्री. अमर वर्मा तसेच नेहमीच अडीअडचणीला 'ओ' देणारे भाविक संगीतकार श्री. स्नेहल भाटकर या सर्वांनी नाटकाच्या उभारणीला मोठ्या प्रेमाने हातभार लावला.
असे साहाय्य कितीकांचे झाले म्हणून सांगावे ! हे सारे श्रेय भोब्यांच्या पुण्याईचे ! त्यांच्यामुळे आमच्याही वाट्याला या मातब्बरांचा लोभ आला-
आज कै. गोपाळकृष्ण भोबे यांचे हे नाटक रसिकांना सादर करून मित्रऋण अंशतः तरी फेडण्याची संधी आम्ही साधत आहोत. या नाटकाची पुढची यशस्वी वाटचाल संस्थेवर व कै. भोत्र्यांवर अपरंपार प्रेम करणार्या शेकडो रसिकांच्या सहानुभूतीवर अवलंबून आहे.
अधिक काय लिहावे ?
(संपादित)
धि गोवा हिंदु असोसिएशन, कला विभाग
दि. १६ नोव्हेंबर १९६८
'धन्य ते गायनी कळा' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.