A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इतकेच मला जाताना

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया,
पाऊल कधी वार्‍याचे माघारी वळले होते?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही-
मी रंग तुझ्या स्वप्‍नांचे अश्रूंत मिसळले होते

घर माझे शोधाया मी वार्‍यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो..
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार - कविता
सरण - चिता.
सुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली आणि नवकवितेच्या ह्या जमान्यात नुसत्या निरनिराळ्या रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फारकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात ह्या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणार्‍या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निसर्गाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळूक जावी, तशी ती कविता अंगावरून गेली. त्या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकदही मोठी होती. त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्याने त्या कवितेचे गाणे झाले नव्हते.

कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरीची ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानेलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात, कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्या उलट, काही कविता अत्यंत समंजसपणे गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात. त्यांचे व्यकिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरी ती कविता असते. गाणे आणि कविता ह्यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटण्याचे कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्याने तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.

एक काळ असा होता की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुधे येऊ लागला. ती आता मूकपणे डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्या मनात कविता वाचण्याची पद्धत अलीकडची. ठराविक ठशातून कागदावर उमटणार्‍या अक्षरांमुळे तोंडातून उमटण्यार्‍या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिणामाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्‍न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरांतून उमटवण्याचा प्रयत्‍न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली.

भटांची कविता गात येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंत:करणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पद्धतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेणाने काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रुजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गत:च सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते, असे माझ्या आवडीचे बा. भ. बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु. शि. रेग्यांना भेटणारे शब्द सतत फूलपाखरासारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसेच सुरेश भट यांच्या भोवती हे सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाणार्‍या कवितेने ह्या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरुवात केली, हे सुरेश भटांनाही कळले नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्‍या संगीत दिग्‍दर्शकांविषयी मला आदर असूनही, सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात, त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही.
वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्याची ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेचा संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.
(संपादित)

पु. ल. देशपांडे
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.