A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगाचे बंध कोणाला

जगाचे बंध कोणाला, जगाला बांधला त्याला !
मला जो थांबवी ऐसा, जगीं निर्बंध ये कैसा?
जगानें देह हा केला, जगाला वाहिलें त्याला;
हाणा मारा खुडा तोडा, परि आतां मला सोडा !
न कीर्तीला, न प्रेमाला, न सौख्याला, विलासाला,
न विघ्‍नाला, न मृत्यूला, मला ये आडवायाला !
पुरे संबंध प्रेमाचा, नको हा खेळ प्रेमाचा,
मिळे ज्या प्रीतिचा प्याला, विषारी तो असा मेला ! [१]
गीत - बालकवी
संगीत - छोटा गंधर्व
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - उद्यांचा संसार
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• काव्य रचना- एप्रिल १९१४.
• [१] - मूळ कवितेतील ओळ
'खरा जो प्रीतिचा प्याला- जगीं प्याला सुखी झाला.'
'घराबाहेर' नाटकाप्रमाणेंच सदर नाटक हें स्वतंत्र असून, संक्रमणावस्थेंतून जात असलेल्या आज, उद्यांच्या महाराष्ट्रीय हिंदु समाजांतील संसाराचें एक चित्र यांत रंगविण्याचा प्रयत्‍न केलेला आहे. जुन्या आचारविचारांची रूढ चाकोरी बुजत चाललेली असली, तरी नवीन आयुष्यक्रमाची आखणीहि अद्यापि तितकी ठळकपणें झालेली नसल्यामुळे समाजांतील कर्त्या पुरुषांची मनें संदेहाच्या धुक्यांत सांपडल्याप्रमाणें अडखळल्यासारखीं झालेलीं आहेत; पुढार्‍यांची दिशाभूल झाल्यामुळें आंधळेपणानें मागाहून येणार्‍या मंडळींत उडालेल्या गोंधळाला सीमाच उरलेली नाहीं. त्यामुळे वैयक्तिक मतांचा बेजबाबदार धुरोळा उसळून न्यायबुद्धि व कर्तव्यप्रीति यांजवर सांवट आल्यासारखें झालेलें आहे. वागणुकीला धरबंद न राहिल्यामुळे समाजांतील शिस्तीचा सलगपणा उलगडल्यासारखा झालेला आहे. त्यागबुद्धि व सहिष्णुता या मानवी सद्गुणांच्या पायावर उभारलेला संसाराचा मनोरा आज इतका कललेला आहे कीं, त्याच्या सुरक्षितपणाबद्दल उघड्या डोळयांनीं विचार करणार्‍या प्रत्येक समंजस माणसाच्या मनांत जबरदस्त भय उत्पन्‍न झाल्याखेरीज रहाणार नाहीं, हीच हें नाटक लिहिण्याच्या तळांतली बैठक आहे. उद्यांच्या काळांत संसार कसा मांडावा याबद्दलचें उपदेशपर दिग्दर्शन या नाटकांत केलेले नसून, आयुष्यांतली जबाबदारी विसरून वागणार्‍यांचा 'उद्यांचा संसार ' कोणत्या स्वरूपाचा होण्याचा संभव आहे हें यांत चित्रित केलेलें आहे. विश्राम व करुणा यांच्या संसाराच्या चौकटींत शैलाचें चित्र ठळकपणे मांडण्यांत प्रस्तुत कालीं महाराष्ट्रीय समाजांत सुशिक्षित प्रौढ कुमारिकांचा प्रश्न किती बिकट होत चाललेला आहे, याकडे विचारवंतांनीं जागरूकपणे पहावें एवढाच हेतु आहे. दिग्दर्शित सामाजिक संकटांमधून बाहेर मार्ग कसा काढतां येईल हें सांगण्याचा नाटककाराचा अधिकार नाहीं. धोक्याची ठिकाणें अनुभविकांच्या तोंडून कळल्यानंतर उपायाचे पूल बांधण्याचे काम समाजांतील स्थापत्यशास्त्रकोविदांचें आहे हें सांगणें नलगे. इब्सेन म्हणतो त्याप्रमाणें प्रश्न विचारण्याचें काम नाटककाराचें आहे; उत्तरें ज्यांनी त्यांनी आपापल्या मगदुराप्रमाणें व परिस्थितीप्रमाणें विचार करून शोधून काढावीत.

सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय कवि कै. विनायक व कै. बालकवी ठोमरे यांच्या दोन गीतांचा मीं या नाटकांत उपयोग केलेला आहे. बालकवींच्या गझलमधील शेवटच्या ओळीचा उत्तरार्ध मी प्रसंगानुरोधानें बदललेला आहे.
(संपादित)

प्रल्हाद केशव अत्रे
'उद्यांचा संसार' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख