A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगण्यासाठी आधाराची

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो, तो खरंच, आधार असतो का?

गर्द अंधारातुन आपण प्रकाशात येताना, एकटेच असतो !
पुन्हा काळोखात विरताना सुद्धा, हा एकटेपणाच आपली सोबत करतो !

मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का?
जिच्यामुळे असहाय्य व्हावं, एवढी तिची मिजास का?

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?

ज्यांचा आधार शोधायचा, ते तरी कुठे समर्थ असतात !
खरं म्हणजे, ते देखील आपल्यासारखे, उजेडात चाचपडत असतात !!

तरीही त्यांच्या हाताची ऊब आपणाला का हवी असते?
गंमत म्हणजे, आपल्या खांद्यावरही कुणाची मान विसावू पहाते !

अखेर 'आधार' या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?
जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का?
गीत - सुधीर मोघे
संगीत - बाळ बर्वे
स्वर- चंद्रशेखर गाडगीळ
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• दूरदर्शन कार्यक्रम 'शब्दांच्या पलीकडले'साठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.