A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगिं आभास हा दाविला

जगिं आभास हा दाविला । वितराग तो झणिं मालविला ॥

उगाचि विकास दुरावला । धादांत वेदांत खुळावला ।
करगत हरविलि झळकत मिरविलि अविरत दिपविल प्रतिभा अमला ॥
अमला - देवता लक्ष्मीचे एक नाव / शुद्ध.
झणी - अविलंब.
वितराग - अनासक्त.
प्रस्तुत नाटकाचा विषय महाराष्ट्रीय बहुजनसमाजाला बराचसा अपरिचित आहे, असें म्हटलें तरी अनुचित होणार नाही. कॉटन मार्केटमध्यें खेळणार्‍या व्यापार्‍यांत महाराष्ट्रीयांची संख्या अगदीं अल्प आहे. व्यापारी जीवनाच्या दृष्टीनेंही महाराष्ट्रीय मागासलेलेच आहेत. तरीही व्यापार्‍यांच्या निरनिराळ्या पेढ्यांवर किंवा सेक्रेटरीयटसारख्या बड्या सरकारी ऑफिसांत कारकुनी करणार्‍यांचे जीवनही वरिष्ठांच्या अनुषंगानें गृहसौख्याला पारखें झालेलें आहे. तेवढ्यापुरती तरी या विषयाची जाणीव महाराष्ट्रीय प्रेक्षक-वाचकाला पारखी भासणार नाहीं.

यांतील दुसरा जो पोटविषय आहे, तो मात्र सार्‍याच महाराष्ट्रीयांच्या जिव्हाळ्याचा आहे. आंखफरकावर खेळणार्‍यांची संख्या महाराष्ट्रीयांत भरपूर आहे. तेवढ्यापुरता तरी नाट्यवस्तूचा हा पोटभाग आमच्या प्रेक्षक-वाचकांना आकर्षक होईल.

कपाशीच्या व्यवहारांतील आडवे-तिडवे सांदी-कोपरे मला बरेचसे अपरिचित होते. त्यांचा अभ्यास करण्याच्या कामी माझे मित्र राजारामपंत नेरलीकर यांचे बहुमोल सहाय्य झालें.

स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीं कराव्या, या तत्त्वासाठी आज मी बरीच वर्षे झगडत आहे. त्याबद्दल माझी थट्टाही होत आहे. पण दिवसेंदिवस हें तत्त्व अमलांत येण्याचीं लक्षणें कितीतरी आशास्पद वाटूं लागलीं आहेत. या तत्त्वाच्या समर्थनासाठींच हें नाटक लिहिलें गेलें आहे. तें बसविण्याचे कामीं हिराबाई प्रभृति भगिनीत्रय आणि त्यांच्या कर्तृत्ववान मातुश्री ताराबाई माने यांनी जो उत्साह दाखविला आणि जे परिश्रम केले, ते माझ्या या तत्त्वाच्या समर्थनाला पोषक झाल्याचें प्रेक्षकांना दिसून येईल, अशी मला आशा आहे.

नाटकांतील पदांच्या कांहीं चाली विद्यालयाचे एक घटक सुरेशबाबू यांनी व कांही दिनकर ढेरे यांनी दिल्या आहेत. पण ज्या एका विशिष्ट प्रकारच्या चाली भावनात्मकतेच्या दृष्टीनें पाहिजे होत्या, त्यांची अचुक निवड करून संगीतशुद्ध बसविण्याच्या कामीं विष्णुपंत पागनीस यांनी घेतलेले परिश्रम बिनमोल आहेत.

या नाटकांत पुनः एकदां शेवटीं 'राष्ट्रगीत' घातलें आहे. या बाबतींतले पूर्वीचे पेंढारकर यांचे प्रयत्‍न फुकट गेले. 'राष्ट्रगीत' सुरू होतांच एक क्षणाची कळ सोसून उभे राहण्याइतकें राष्ट्रीयत्व महाराष्ट्रीयांत आहे, असें या भगिनीत्रयांच्या स्वर-सौंदर्याच्या आकर्षकतेनें तरी ठरलें जावो.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. ८ एप्रिल १९३३
'जागती ज्योत' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- दत्ताराम रामकृष्ण देऊलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.