निष्ठुर मी तुज टाकुन जातें, येशि कशाला माझ्या मागोनी ॥
जन्मतांच तव जननी गेली सोडुनि तुज या तपोवनीं ।
मींच पाळिलें लाड करोनी, कांहिं न अडलें कीं तुझें ।
गेलें जरी मीं, काय उणें तुज सांभाळिती बाबा तुजलागुनि ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वराविष्कार | - | ∙ ज्योत्स्ना भोळे ∙ बालगंधर्व ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | शाकुंतल |
राग / आधार राग | - | आसावरी |
ताल | - | त्रिताल |
चाल | - | गंगेत लोटा हा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • बाळा उपजतांच तुझी आई तुला सोडून गेली तरी तुझें कांहीं अडलें नाहीं. आतां मी सोडून गेलें तरी बाबा तुझा सांभाळ करतील. फिर बाळा माघारी. |
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश हा आधीं नमितों
हें मंगलाचरण म्हणण्यास सुरुवात करणार, तो जणूं पडदा ओढणारासही तेवढा विलंब असह्य होऊन त्याने एकदम पडदा वर केला. त्याबरोब अण्णासाहेबांनी घेतलेली सूत्रधाराची भव्य मूर्ति प्रगट होऊन त्यांचा गंभी आवाज, नाटेकर व शेवडे या पारिपार्श्वकांचे गंधर्वतुल्य आलाप प्रेक्षकांच्या कर्णद्वारीं प्रवेश करूं लागले. त्या प्रसंगी अण्णांचा रंगभूमीवरचा हा प्रवेश म्हणजे संगीत कलेच्या विश्वकर्म्याचा अवतार, असे लोकांस वाटू लागले.
(* नांदी (मंगलाचरण) पडद्यांत म्हणून सूत्रधानें प्रवेश करावयाचा असा कांहीं संस्कृत नाटकांतील सांप्रदाय आहे. परंतु वरील प्रसंगी ती प्रथमच रंगभूमीवर म्हणण्यांत आली.) शकुंतलेची भूमिका शं. बा. मुजुमदार यांनीं घेतलीं. मुजुमदारांचा स्त्रीवेष, गर्भश्रीमंताचे घराण्यांतील यौवनयुक्त रूपसंपन्न, तरुणीसही खालीं मान घालावयास लावील असा 'रूपसुंदरी' परिपूर्ण होता. तसेंच भाषण गोड, सभ्य अभिनय, ठसठशीत कुंकुमतिलक, गोंडस अंगलोट, वर्ण सुवर्ण केतकीसारखा, सर्व प्रकारें मोहक असा होता ! रा. शंकरराव मुजुमदार त्यावेळीं न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ६ वे इयत्तेंतील विद्यार्थी होते, व त्यापूर्वीं ते सांगलीकर पौराणिक नाटक मंडळीमध्यें स्त्रीवेष घेत असल्यावेळेपासून सुप्रसिद्ध होते. दुष्यंताची भूमिका मोरोबा वाघोलीकर यांचेकडे होती. यांचा एकंदर शरीराचा बांधा राजकीय वेशाला साजेल असाच होता. त्याच तोडीची रा. शंकरराव मुजुमदार यांचे शरीराची अंगलट, सुवर्ण केतकीसारखा वर्ण, बोलण्याचालण्याची ढब कुलवधूची, हरिणाच्या नेत्रासारखे नेत्र इत्यादि हें गर्भश्रीमंताचे घराण्यांतील गृहलक्ष्मीलाही लाजविणारें स्त्रीसौंदर्य असल्यानें त्यांची योजना शकुंतलेच्या भूमिकेस अगदी यथार्थ झाली होती. या सर्व पात्रांचे योजक किर्लोस्कर यांचें नाट्यनैपुण्यच तारीफ करण्यासारखें आहे. रा. मुजुमदार यांस गायनकला साध्य नव्हती तरी त्यांनीं त्यावेळच्या संगीत प्रयोगामध्यें किंचितही उणीव जाणूं दिली नाहीं. पुढें रा. लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे रूपानें सुंदर, पल्लेदार व मधुर आवाजाचे संगीतकुशल नट लाभल्यानें त्यांची शकुंतलेच्या पात्राचे जागीं योजना होऊन त्यांचेसाठीं पद्येंही तयार झाली. हीं पद्यें खुद्द अण्णासाहेब यांनी रचलीं नसून त्यांचे आज्ञेवरून त्यांचे शिष्य रा. रा. गोविंदराव देवल यांनीं रचिलीं. हीं पद्यें शुद्ध, सुबोध, प्रासादिक व रसिकांस मान्य अशीं झालीं आहेत. कै. देवल यांनी संगीत नाटकाचे कवित्वास येथूनच आरंभ केला होता. ह्यानंतर त्यांनीं संगीत विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक, शापसंभ्रम, शारदा, संशयकल्लोळ या नाटकांमध्यें जी प्रसिद्धि मिळविली तो मान अजून कोणासही प्राप्त झाला नाहीं. असो. कै. किर्लोस्कर जसे प्रासादिक कवि होते, तसे ते उत्तम नटही होते. शाकुंतलमध्ये कण्व शिष्य शार्ङ्गरवाची भूमिका त्या काळी त्यांनी अशी वठविली कीं त्याचा शतांशही आतांपर्यंत कोणासही साधला नाहीं. शार्ङ्गरवाच्या एका पद्यामध्यें 'निज धन तें चोराला' हें पद्य आणि यांत एका गद्याचे शेवटी “अधःपात !" असा शब्द आहे. या दोन ठिकाणीं रसिक प्रेक्षकगणांनीं टाळीची कडकडून गर्जना केली नाहीं असा एकही प्रयोग त्या काळीं झाला नाहीं. तो प्रसंग ज्यांनीं पाहिला आहे त्यांस त्या प्रसंगाची जीवमानपर्यंत कधीही विस्मृति होणार नाहीं. कै. किर्लोस्कर हे संगीत शाकुंतलामध्यें सूत्रधार, वैखानस, सेनापति, शार्ङ्गरव कंचुकी, मारीचऋषि या भूमिका रंगभूमीशीं तादात्म्य होऊन करीत असत. ती तादात्म्यता आतांपर्यंत कोणासच साधली नाहीं !
(संपादित)
त्रिंबक नारायण साठे
दि. १ जानेवारी, १९३०
(रा. रा. बिंबक नारायण साठे यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीशीं जवळ जवळ तिच्या प्रारंभापासून निकट संबंध असल्यामुळें त्यांनीं सदर कंपनीचे संस्थापक व सदर कंपनी आणि त्यांचीं नाटकें याबद्दल आमच्या विनंतीवरून गोळा केलेली माहिती प्रसिद्ध होणें इष्ट वाटलेवरून तो उपोद्घात म्हणून या आवृत्तींत दिला आहे.)
'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पुस्तकाच्या १९३० सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक, आर्यभूषण)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.