A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाणे अज मी अजर

जाणे अज मी अजर । अक्षय मी अक्षर ।
अपूर्व मी अपार । आनंद मी ॥

अचळ मी अच्युत । अनंत मी अद्वैत ।
आदि मी अव्यक्त । व्यक्तही मी ॥

ईश्य मी ईश्वर । अनादि मी अमर ।
अभय मी आधार । आधेय मी ॥

स्वामी मी सदोदित । सहज मी सतत ।
सर्व मी सर्वगत । सर्वातीत मी ॥

नवा मी पुराणु । शून्य मी संपूर्णु ।
स्थुळ मी अणु । जें कांहीं तें मी ॥

अक्रिय मी एक । असंग मी अशोक ।
व्याप्य मी व्यापक । पुरुषोत्तम मी ॥

अशब्द मी अश्रोत्र । अरूप मी अगोत्र
सम मी स्वतंत्र । ब्रह्म मी पर ॥

ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥
अनंत - विष्णू / अंत नसलेला.
अनादि - ज्याच्या आरंभकाळाचा थांग नाही असा.
आदि (आधी) - प्रारंभ / प्रमुख.
आधेय - ठेवलेला. (ज्याला आधार दिलेला आहे ते.)
ईश्य - नियामक.
ईश्वर - समर्थ.
क्षय - अधोगती / घट.
क्षर - विनाशी. (अक्षर- अविनाशी)
गोत्र - कुळ, वंश. (Lineage)
च्युत - निघालेला. (अच्युत - स्थिर)
- उत्पन्‍न झालेला. (अज- जन्मरहित)
जरा - वृद्धत्‍व. (अजर- जरारहित, वार्धक्यरहित)
द्वैत - जोडी / भेदभाव / देह व जीव वेगळे मांडणे / एका वनाचे नाव.
निरुते - खरे / शुद्ध.
पर - श्रेष्ठ, नंतरचा / पंख.
व्याप्य - व्यापले जाणारे.
शोत्र - कानासंबंधी.
सर्वगत - सर्व ठिकाणी ज्याचे अस्तित्व आहे असा.
मूळ रचना

जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।
अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥

ज्ञानेश्वरी - अध्याय अठरावा

  संपूर्ण कविता / मूळ रचना

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.