A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जपत किनारा शीड सोडणे

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन्‌ वार्‍याची वाट पाहणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा!
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्या हाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवेफुगवे.. भांडणतंटे.. लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन्‌ उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती, तत्त्वे.. फसवी गणिते! दूर बरी!
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर!
गीत- संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर - सलील कुलकर्णी , संदीप खरे
अल्बम- नामंजूर
गीत प्रकार - कविता
आदिम - आरंभीचा / सुरुवातीचा.
कळा - युक्‍ती, कौशल्य.
तारण - अनामत / गहाण ठेवलेली वस्तू.

 

  सलील कुलकर्णी, संदीप खरे