A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय देव जय शिवराया

जय देव जय देव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया

आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया

श्रीजगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया

त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
गीत- स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
गीत प्रकार - स्फूर्ती गीत प्रभो शिवाजीराजा
  
टीप -
• काव्य रचना- पुणे, १९०२ साल.
• फर्ग्युसन महाविद्यालयांतील 'आर्यन संघ' नावाच्या चौथ्या भोजनसंघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही आरती रचली.
अनन्य - एकरूप / एकटा.
म्लेंच्छ - यवन / हिंदुव्यतिरिक्त अन्य धर्मी.
रव - आवाज.
शुंभ - एक राक्षस. निशुंभाचा भाऊ. दोघांनी ब्रह्मदेवास संतुष्ट करून कोणाही पुरुषाकडून आपला वध होऊ नये असा वर मागितला. पुढे काली देवीच्या हातून दोघांना मृत्यू आला.
सद्गद - कंठ दाटून येऊन.

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  लता मंगेशकर