A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय गंगे भागीरथी

जय गंगे भागीरथी !
हर गंगे भागीरथी !

चिदानंद-शिव-सुंदरतेची पावनतेची तूं मूर्ती
म्हणुनि घेउनि तुला शिरावर गाइं महेश्वर तव महती !

जगदाधारा तव जलधारा अमृतमधुरा कान्‍तिमती
'शंकर शंकर, जय शिव-शंकर !' लहरि लहरि त्या निनादती !
गीत - विद्याधर गोखले
संगीत - वसंत देसाई
स्वराविष्कार- प्रसाद सावकार
∙ नांदी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - पंडितराज जगन्‍नाथ
राग - कलावती
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
कांतिमान - तेजस्वी.
नाटय-गंगेच्या किनारी

'स्थितिं नो रे दध्या : क्षणमपि मदांधेक्षण सखे !'
( हे मदांधाक्ष मित्रा येथें क्षणभरहि राहूं नकोस ! ) असा आव्हानात्मक संस्कृत श्लोक 'केसरी'वर परवांपर्यंत छापीत असत. हल्लीं या श्लोकाचें कै. वासुदेवशास्त्री खरे कृत मराठी भाषांतरच छापतात.

सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी मी शाळकरी विद्यार्थी असतांना, या श्लोकाचा अन्वयार्थ माझ्या वडिलांचे परममित्र कै. वीर वामनराव जोशी यांना एकदां सहज विचारला, तेव्हां वामनराव दादांनी त्याचा अन्वय नि अर्थ आपल्या वक्तृत्वपूर्ण शैलीनें समजावून सांगितला. इतकेंच नव्हे तर, हा श्लोक निबंध-मालाकार कै. चिपळूणकरांनी कोणत्या गर्भितार्थानें 'केसरी'वर घातला, ह्या श्लोकाचा कर्ता कोण, इत्यादि माहितीहि सांगितली. त्यावेळींच मला प्रथमतः कळलें कीं, लोकमान्य टिळकांच्या केसरीनें महाराष्ट्राच्या घरोघर पोहोचविलेला हा वीररसात्मक सुंदर श्लोक जगन्‍नाथ पंडितांचा आहे.

या लहानशा प्रसंगाने माझीं जगन्‍नाथ जिज्ञासा वाढली आणि पुढे कॉलेजांत गेल्यावर जगन्‍नाथ पंडितांचे बहुतेक प्रमुख ग्रंथ मी वाचून काढले. त्यानंतर वृत्तपत्र व्यवसायाच्या धकाधकीच्या जीवनांतहि जगन्‍नाथाच्या रगेल नि रंगेल वाङ्मयाचा, त्याचप्रमाणें चरित्राचा, अभ्यास चालूच होता. यांतूनच या महापंडिताच्या वैचित्र्यपूर्ण जीवनावर नाटक लिहिण्याची इच्छा मनांत निर्माण झाली.

ऋण-निर्देश
मात्र ती आत्मविश्वासाच्या अभावीं मनांतच विराम पावली असती. पण माझे मित्र व मेहुणे श्री. मधुकर महाजन व व्यवसायबंधु श्री. विजय तेंडुलकर यांनी नाना प्रकारें प्रोत्साहन देऊन माझा न्यूनगंड काढून टाकला. आणि अखेर मी या नाटकलेखनाच्या साहसास प्रवृत्त झालों. माझे ज्येष्ठ कलाकोविद मित्र चित्रकार श्री. द. ग. गोडसे यांच्याशीं चर्चा करून नाटकाचा प्राथमिक आराखडा तयार केला आणि कांहीं दिवसांतच नाटकाचे लेखन संपविलें. या प्राथमिक लेखनकालांत श्री. विजय तेंडुलकर व नटवर्य श्री. मामासाहेब पेंडसे या दोघांनीहि मला चांगलें उत्तेजन दिलें; चांगल्या सूचना केल्या. पुढें प्राथमिक लेखन मामा पेंडसे यांच्या पसंतीस उतरल्यानंतर, ते मला श्री. भालचंद्र पेंढारकर यांच्याकडे घेऊन गेले. ही घटना माझ्या आयुष्यांत फार मोलाची ठरली. माझ्या नाट्यकृतीला उत्कृष्ट स्थळ मामांनी पाहून दिले !

नाट्य-तपस्वी नटवर्य केशवराव दाते व त्यांच्याच व्यासंगी परंपरेंतील अभिजात अभिनयपटु नट श्री. मामा पेंडसे, ललितकलादर्शचे सुप्रसिद्ध नेपथ्यकार श्री. पु. श्री. काळे, भारतीय कीतींचे संगीत दिग्दर्शक श्री. वसंतराव देसाई, बहुभाषापंडित इतिहास संशोधक श्री. सेतुमाधवराव पगडी, मूलग्राही दृष्टीचे कला-कोविद चित्रकार श्री. द. ग. गोडसे इत्यादि नाट्य-मर्मज्ञांपुढें मी अनेकदां माझ्या या नाटकाचें वाचन केलें. त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणांत भरपूर चर्चा झाली. वादे वादे नाटय-बोध झाला. आणि अखेर हें नाटक रंगभूमीवर पदार्पण करण्यास योग्य ठरले.

या अधिकारी पुरुषांनीं बहुमोल साहाय्य केलें, अनुभवसिद्ध सूचना केल्या त्यांचा ऋणनिर्देश करणें माझें कर्तव्यच आहे.

हे नाटक वैभवशाली स्वरूपांत सादर करणार्‍या भालचंद्र पेंढारकरांचें ऊदंड ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावें? त्यांची नाट्य-कलाविषयक तन्मयता, तळमळ, लोकसंग्रही वृत्ति, संघटना-कौशल्य इत्यादि गुण पाहून मी तर भारावून गेलो. त्यांच्यासारखा नाटय मर्मज्ञ, कष्टाळू कलावंत हल्लीच्या पिढींत विरळाच. माझी नाटय-कन्या सर्वांगसुंदर व्हावी, जगन्‍नाथाच्या भाषेंतच सांगायचें झाल्यास-
निर्दूषणा गुणवती रसभावपूर्णा ।
सालंकृती श्रवणमंगल-वर्णराजिः ।

अशी व्हावी, म्हणून त्यांनी तन-मन-धन पूर्वक अपरंपार प्रयत्‍न केले. त्यांच्या सहवासांत मला नाट्य लेखनाची विशिष्ट दृष्टि यथामति प्राप्त झाली. या क्षेत्रांत मला सुस्थिर करण्यास तेच कारणीभूत झाले आहेत.

प्रा. व्ही. ए. रामशास्त्री, प्रा. हरदत्त शर्मा, प्रा. बनारसीप्रसाद सक्सेना, प्रा. कानुनगो, सर जदुनाथ सरकार, प्रा. पी. के. गोडे, प्रा. आठवले व प्रा. ग. त्र्यं. देशपांडे यांचे जगन्‍नाथासंबंधीं अथवा मोंगल राजकर्त्यांसंबंधीं जे तोलामोलाचें लिखाण आहे, त्याचा मला बराच उपयोग झाला. त्यांचाहि मी आभारी आहे.

इतिहास आणि नाटय
या नाटकाचा नायक कालिदास-भवभूति-जयदेव यांच्या परंपरेतील अखेरचा महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्रज्ञ पंडित जगन्‍नाथ हा आहे. ज्याचे 'गंगालहरी' स्तोत्र आजहि दशाहारांत घरोघर वाचलें जाते, असा थोर गंगा-भक्त या ऐतिहासिक नाटकाचा मुख्य आधारस्तंभ आहे. 'भामिनी विलास' या मधुर ग्रंथानें रसिकांचे अंतःकरण आनंदित करणारा आणि आपल्या अपुर्‍या 'रसगंगाधरा'नें साहित्यशास्त्रज्ञांना चुटपूट लावणारा 'पंडितराज-राजतिलक जगन्‍नाथ' हाच या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या जीवनावरचें नाटक शक्य तेवढें इतिहासशुद्ध पाहिजे, ही जाणीव मी सोडली नाहीं. पण “हें प्रथमतः नाटक आहे; जगन्‍नाथाचे सांगोपांग चरित्र नव्हे, त्याजवरील प्रबंध तर नव्हेच नव्हे" हेहि मी विसरलों नाहीं. येथे प्राधान्य नाटकाला आहे, इतिहासाला नव्हे.

दुर्देवाने आपल्या अनेक महाकवींप्रमाणेंच जगन्‍नाथ यांची निश्चित माहिती फारच थोडी उपलब्ध आहे. "हा संस्कृत कवि १७ व्या शतकांत होऊन गेला. त्याचे आई, वडील नि गुरु यांचीं नांवें अमुक अमुक. गंगालहरी-यमुनालहरी, विष्णुलहरी, भामिनी विलास, आसफविलास, रसगंगाधर इत्यादि ग्रंथ त्यानें लिहिले. आणि त्याला शहाजहानचा आश्रय होता." एवढेंच साधारणतः निःशंकपणाने म्हणतां येते. बाकींचें चरित्र प्रायः दंतकथास्वरूप आहे.

जगन्‍नाथाविषयींच्या ५-२५ दंतकथा मनोरंजक आहेत, हें खरें. तथापि त्यांना ऐतिहासिक पुराव्याचा निःशंक आधार सांपडत नाहीं. फार कशाला, या नाटकाला पायाभूत ठरलेली लवंगी-जगन्‍नाथ प्रणयाची महत्त्वाची आख्यायिकाच घ्या ना. ही आख्यायिका कितीतरी प्रसिद्ध आणि पुराणी आहे. (मुस्लीम स्त्रीशी जगन्‍नाथरायांचा प्रणयसंबंध असल्याबाबत पहिला उल्लेख सन १८२८ मध्यें नकलण्यांत आलेल्या 'सदाशिव' कृत गंगालहरी टीकेंत- अत्र एवं श्रुयते । जगन्‍नाथो दिल्लोवल्लभाश्रितः, तत् यवनी संसर्ग दोषभाक् सन्…" इत्यादि ओळींत आढळतो ) ही आख्यायिका संभाव्य कोटींतील असू शकते, असें मत 'भांडारकर रिसर्च इन्स्टिटयूट'चे प्रा. पी. के. गोडे यांच्यासारख्या विद्वानांनीहि व्यक्त केलें आहे. पण तरीहि ती आख्यायिकाच ! अस्सल ऐतिहासिक पुरावा नव्हे. काही संशोधकांना ती असंभाव्य वाटते. इतर कांहीं दंतकथा तर उघड उघड तर्कदुष्ट भाकडकथाच आहेत.

परिस्थिति ही अशी असल्याने जे, संस्कृत-ग्रंथ निर्विवादपणे पंडित जगन्‍नाथाचे ठरले आहेत, त्यांचे परिशीलन करून, या महापंडिताची एक व्यक्तिरेखा मीं प्रथम मनांत कल्पिली. रंगेल रगेलपणा, गर्विष्ठपणाची मनोहर किनार असलेला स्वाभिमानी बाणा, गंगामाईचीं अनन्यभक्ति, तत्कालीन हिंदी-फारसी साहित्यांतील नवीन अर्थछटा नि कल्पना आत्मसात् करण्याइतकी व्यापक रसिकता, प्राचीन परंपरेचा अभिमान असूनहि स्वतंत्रप्रज्ञ पांडित्य, वादविवाद कौशल्य इत्यादि गुणविशेषांनी मंडित झालेली पंडितकवीची मूर्ति, जगन्‍नाथाचे वाङ्मय बाचून मनांत उभी राहिली.

मग अशी ही वैशिष्ट्यपूर्ण महान् व्यक्ति १७ व्या शतकांतील त्या मोंगल दरबारांत नि समाजांत कशी वागली असेल, असा विचार करूनच दंतकथांची निवड करावी लागली. इतकेच नव्हे तर, त्या निवडक दंतकथांचेहि रंग बदलावे लागले, नवीन काल्पनिक प्रसंग नि पात्रे देखील जगन्‍नाथरायांची वाङ्मयीन मूर्ति व तत्कालीन परिस्थिति यांच्या संदर्भातच निर्माण करणे आवश्यक ठरले. अशा प्रकारें इतिहासाशीं शक्य तेवढे इमान राखून, चमत्कारांचा भाग वगळून, गंगालहरी-कर्त्यांचें आणि तत्‌संबंधित व्यक्तींचें रेखाटन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्‍न मी केला आहे.

येथेच हे नमूद केलें पाहिजे की, जगन्‍नाथाच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा काळ साधारणतः इ. स. १६३० ते १६६० असा मानतात. 'दिल्लीवल्लभ- पाणि पल्लव तले नीतं नवीनं वयः' असे खुद्द जगन्‍नाथानेच लिहून ठेवले आहे. आसफखानाच्या- शहाजहानच्या श्वशुराच्यासंबंधी लिहिलेल्या काव्यग्रंथांत जगन्‍नाथांनीच 'पंडितराज' ही पदवी दिल्लीवल्लभ शहाजहान बादशहाने आपणास दिल्याचा उल्लेख केला आहे. या, व अशा प्रकारच्या इतर प्रमाणांनी जगन्‍नाथाचा कालखंड निश्चित करतां येतो. जगन्‍नाथाच्या दिल्ली-बल्लभांची, म्हणजे शहाजहान व दाराशुकोह यांची, कारकीर्द १६५८ साली पूर्णतः समाप्त होऊन, औरंगजेब तख्तावर आला. आणि त्याच सुमारास जगन्‍नाथ पंडितांना दिल्ली सोडावी लागली असावी.

हे सर्व लक्षांत घेतां वस्तुतः या नाटकाचा प्रथमार्ध नि उत्तरार्ध, जगन्‍नाथाचा सुखाचा काळ नि संकटाचा काळ, यांत बरेच अंतर दाखवावयास पाहिजे होते. पण केवळ नाटयरसाची हानि होऊं नये म्हणून, हे दोन्ही कालखंड भी परस्परांजवळ खेचले आहेत; दिल्ली सोडण्याचा प्रसंग जगन्‍नाथावर लवकर आणला आहे. सुज्ञ प्रेक्षक नि वाचक हा अतिप्रसंग मानणार नाहींत, अशी आशा आहे.

'ललितकलादर्श'चें संस्थापक कै. केशवराव भोसले यांच्या मंगल स्मृतिदिनीं हें नाटक रसिकांच्या हातीं देतांना, मुक्तेश्वराच्या उक्तींत जरा बदल करून मी म्हणेन-
एकेक अक्षर-तंतूची भीक ।
थोर थोरां मागोनि देख ।
यां पामरे हा विणला एक । नाट्य-पट ॥
आवडो हे पीतांबर ।
जनता-जनार्दनातें उदार ।
विनवी शारदा-चरण-किंकर ॥

(संपादित)

विद्याधर गोखले
दि. ९ ऑक्‍टोबर १९६०
'पंडितराज जगन्‍नाथ' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- संजय प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.