A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय गंगे भागीरथी (२)

जय गंगे भागीरथी !
हर गंगे भागीरथी !

जयजयकारें तुझ्या मंगले !
दुमदुमलें अंबर-धरती !

उदक नव्हे, तव उदारताची
अखंड वाहे या जगतीं !

परम दयाळे ! महन्मंगले !
देई भक्ताला मुक्ती !

जय गंगे भागीरथी !
हर गंगे भागीरथी !
उदक - पाणी.
जय गंगे भागीरथी !

१९६० सालच्या 'पंडितराज जगन्‍नाथ' या विद्याधर गोखले लिखित नाटकातील हे पद आहे. प्रसाद सावकार यांच्या अवाजातील या पदाचे आविष्करण सर्वदूर पोहोचलेले आहे.
या पदाच्या संदर्भात पुणे आकाशवाणीच्या अर्चना साने यांनी एक प्रश्न पुढे आणला.
त्या निमित्ताने नाटकात जगन्‍नाथ कवीची प्रमुख भूमिका करणारे भालचंद्र पेंढारकर यांचे सुविद्य चिरंजीव ज्ञानेश पेंढारकर यांनी दिलेली माहिती खाली देत आहे.

तपशीलात जाण्याच्या आधी- अर्चनाताई आणि ज्ञानेशजी यांचे मन:पूर्वक आभार. अर्चनाताईंनी शंका पुढे आणली आणि ज्ञानेशजींनी त्याचे तत्पर सखोल निरसन केले. तसेच त्यांनी या पदाची 'भैरवी'तील ध्वनिफीत 'आठवणीतली गाणी'च्या श्रोतृवर्गासाठी उपलब्ध करून दिली आहे.

'पंडितराज जगन्‍नाथ' या नाटकाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होते.
नाटकात गायक कलाकार दोन. भालचंद्र पेंढारकर (जगन्‍नाथ) आणि प्रसाद सावकार (जमनलाल).

नाटकात 'जय गंगे भागीरथी' हे पद तीनदा येते.

नाटकाचा पडदा उघडताना हे पद प्रचलित नांदीसारखे न घेता दुरून ऐकू येणार्‍या भजनासारखे ऐकू येई. त्यासाठी त्याचे स्वतंत्र ध्वनिमुद्रण केले गेले होते. ही स्वररचना 'जयजयवंती' रागात व 'वसंत' ठेक्यात आहे. ('आठवणीतली गाणी'वर स्वराविष्कार विभागात ते नांदी म्हणूनच नमूद केले आहे व ऐकण्यास उपलब्ध आहे.)

त्यानंतर नाटकाच्या संहितेनुसार ते अगदी शेवटी येते.
'अखेर, सारे राजेशाही वैभव सोडून तो बाणेदार महाकवि, 'पंडितराज जगन्‍नाथ' आपल्या निष्ठावंत पत्‍नीसह जगज्जननी भागीरथीच्या आश्रयाला आला. आणि पायाशी लोळण घेत आलेले सुख-वैभव दूर सारून, अमर 'गंगालहरी'चा तो निर्माता 'जय गंगे भागीरथी' हा पुण्यघोष करीत गंगेत विलीन झाला.'
- असा तो प्रसंग आहे. त्यावेळेस मेघगर्जना, विजांचा चकचकाट, वादळाचा आवाज, गंगेचा खळखळाट.. असं सगळं रंगमंचावर ध्वनी-चित्र स्वरूपात यायला हवं होतं. त्याकाळात लेपल माइक नव्हते. एका ध्वनिक्षेपावर गायकाचा आवाज वरील सर्व पार्श्वसंगीतात संपूर्ण नाट्यगृहात पोहोचणे शक्य नव्हते.
म्हणून नाटकाची भैरवी, जिची पहिली ओळ 'जय गंगे भागीरथी ! हर गंगे भागीरथी !' अशीच आहे पण पुढील काव्यविस्तार वेगळा आहे, भालचंद्र पेंढारकर यांच्याच आवाजात रेकॉर्ड करून नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस प्लेबॅक सारखे पेंढारकर स्वत: सादर करत.
ही स्वररचना 'भैरवी'तील आहे.
(शब्द वेगळे असल्याने 'आठवणीतली गाणी'वर ते स्वतंत्र पद म्हणून जोडण्यात आले आहे.)

नाटकाच्या पहिल्या सात प्रयोगांपर्यंत हे असे होते. म्हणजे प्रसाद सावकार यांच्या मुखी पहिल्या अंकातील 'सावन घन गर्जे' हे एकच पद असे.
त्यांना गाण्यास अजून एक पद असावे, असे वाटल्याने दुसर्‍या अंकात मुद्दाम जागा काढून प्रसाद सावकारांना 'जय गंगे' हेच पद देण्यात यावे, असे ठरले. त्याची चाल 'कला-वसंत' रागात करण्यात आली. ही जागा काढण्याची कल्पना व ही चाल, दोन्ही बाबतीत प्रसाद सावकार साशंक होते. आठव्या प्रयोगाच्या वेळी, रंगमंचावर जाताना सुद्धा त्यांनी तसे बोलून दाखवले. पण आज प्रयोग करू, मग पुढे काय ते पाहू, असे ठरले. पण प्रसाद सावकार यांनी तिथे वन्स मोअर घेतला आणि हे पद त्यांच्याशी कायमचे जोडले गेले.
प्रसाद सावकार म्हणजे 'जय गंगे भागीरथी' आणि 'जय गंगे भागीरथी' म्हणजे प्रसाद सावकार असे समीकरण झाले होते. (प्रसाद सावकार यांच्या सादरीकरणातून नांदी/भजन रचनेतील एक ओळ वगळण्यात आली आहे.)

टीप- नाटकाचे लेखक विद्याधर गोखले यांनी लिहिलेली सविस्तर प्रस्ताववा 'जय गंगे भागीरथी (१)' या पदाशी जोडलेली आहे.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.