A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
गीत - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- शाहीर साबळे
राग - भूप
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• हे पद (या पदाची पहिली दोन कडवी) महाराष्ट्र राज्याचे 'राज्यगीत' म्हणून अंगिकरण्यात आले आहे.
• राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते, तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे.
मात्र राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.
• राज्यगीत १.४१ मिनिटात वाजवले अथवा गायले जावे.
थडी - तीर / कुळ / मर्यादा.
निढळाच्या घामाचा - (कपाळाचा घाम) स्वत:च्या अंगमेहनतीने मिळवलेला.
संपूर्ण कविता

जय जय महाराष्ट्र माझा- गर्जा महाराष्ट्र माझा
रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा
निळेनिळे आकाश झाकते या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाउस वर्षविती भूवरी
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीष्मथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू
चघळित पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडो
ठसक्याची लावणी तशी ही ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रगेल मोठा करितो रणमौजा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा

  संपूर्ण कविता / मूळ रचना

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.